एटीएम व्हॅनमधून सव्वा कोटी रुपयांची रोकड पळवून नेणाऱ्या चालकाला मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेने अवघ्या २४ तासांत कल्याण रेल्वेस्थानकातून अटक केली. अमर सिंग असे या चालकाचे नाव असून तो बिहार येथील आपल्या गावी पळून जाण्याच्या तयारीत होता.
मानखुर्दच्या सायन ट्रॉम्बे रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये शुक्रवारी दुपारी लॉजिकॅश कंपनीची व्हॅन रोकड भरण्यासाठी आली होती. कंपनीचे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेले असताना व्हॅनचालक अमर सिंगने व्हॅनसकट व्हॅनमधील १ कोटी २४ लाख रुपये घेऊन पळून गेला होता. ही व्हॅन त्याने नंतर माटुंगा येथे सोडून दिली होती. मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी आणि पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस पथके आरोपीच्या शोधासाठी तयार करण्यात आली होती. मालमत्ता शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, नितीन पाटील, पोलीस निरीक्षक भोसले यांच्यासह संजय पाटील, दत्ता कुडले आदींच्या पथकाला अमर सिंग बिहारमधील पाटणा येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकात सापळा लावला. शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास त्याला रेल्वेस्थानकातून अटक केली. कुणी आपल्याला ओळखू नये म्हणून अमर सिंगने केस बारीक केले होते, तसेच दाढी काढून टाकली होती. त्याच्याकडून लुटलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे. काही रकमेतून त्याने साडय़ा आणि मोबाइल फोन विकत घेतले होते. कर्ज आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही चोरी केल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले.
बेलापूरच्या लॉजिकॅश या कंपनीत तो अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कामाला लागला होता. मात्र कंपनीने त्याला कामावर ठेवण्यापूर्वी कसल्याच प्रकारची पडताळणी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.