मुंबई : मत्स्यविकासमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या वाहनचालकाला करोनाची लागण झाल्याने त्याला घरातच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, अस्लम शेख विलगीकरणात न गेल्याने त्यांच्यासह बैठकीत सहभागी झालेले नेते -अधिकाऱ्यांमध्ये चिंता आहे.

अस्लम शेख यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची करोना चाचणी नुकतीच करून घेतली. त्यात शेख यांच्या सरकारी वाहनावरील या चालकाला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. महापालिके च्या जी-दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी या चालकाला दूरध्वनीवरून त्याबाबतची माहिती दिली. वाहनचालकास कसलीही लक्षणे नसल्याने घरगुती विलगीकरणाची सूचना देण्यात आली. या वाहनचालकाशी संपर्क  साधला असता, शनिवारी सकाळी माझा अहवाल आला. कसलेही लक्षण नसल्याने घरगुती विलगीकरण सांगण्यात आले. मी वरळीतील एका मित्राच्या खोलीवर राहत आहे. शनिवारी सकाळी विलगीकरणासाठी दूरध्वनी आला. मात्र, आता दीड दिवस उलटून गेला तरी एकाही डॉक्टरचा दूरध्वनी आलेला नाही, मी काय करायचे आहे याचे कसलेही मार्गदर्शन करण्यात आलेले नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड  नुकतेच करोनातून बरे झाले असून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या वाहनचालकाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची माहिती पसरताच गेल्या काही दिवसांत शेख यांच्याबरोबर बैठक आणि इतर कामानिमित्त एकत्र आलेल्या नेत्यांमध्ये- अधिकाऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले. तशात रिलायन्स जिओ सेंटरमध्ये करोना विलगीकरणाच्या कक्षाचे काम पाहण्यासाठी अस्लम शेख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे शनिवारी एकत्र होते. त्यामुळे शिवसेनेत  काळजीचे वातावरण आहे.

मी १५-२० दिवसांत त्या वाहनचालकाच्या संपर्कात नाही. चव्हाण नावाचे दुसरे वाहनचालक कर्तव्यावर आहेत. माझ्या कर्मचाऱ्यांसह माझीही चाचणी के ली होती. संसर्ग नसल्यामुळे मला विलगीकरणाची गरज नाही.

– अस्लम शेख, पालकमंत्री, मुंबई शहर