कंपनीची २४ लाखांची रोकड वाहनासह पळवून नेणाऱ्या फरार वाहनचालकास जुहू पोलिसांनी सापळा लावून अटक केली. दीपक ठाकूर (२८) असे त्याचे नाव आहे. कसलाही दुवा नसताना जुहू पोलिसांनी त्याला अटक करीत चोरलेल्या रकमेपैकी २२ लाख रुपये परत मिळविण्यात यश संपादन केले आहे.
अंधेरी येथील युरोप्लस कॅपिटल लिमिटेड कंपनीत महिन्याभरापूर्वी दीपक ठाकूर वाहन चालक म्हणून कामाला लागला होता. त्यावेळी त्याने आपले नाव मनिष सोनार असल्याचे सांगितले होते. २६ मे रोजी कंपनीचा शिपाई वैभव झोरे हा भायखळा येथे कंपनीची २४ लाख ८५ हजार रुपयांची रोकड घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी गाडीचा चालक दीपक होता. भायखळ्याहून परतताना रात्री साडेआठच्या सुमारास जुहू्च्या गुलमोहोर रोड येथे गाडी बंद पडल्याचा बहाणा दीपकने केला. नंतर वैभवला धक्का मारण्यासाठी त्याने खाली उतरवले आणि गाडी घेऊन तो पळून गेला. कंपनीत दीपकने दिलेला पत्ताही खोटा होता.
या तपासाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले की दीपकबाबत कसलाच दुवा नव्हता. त्याचा मोबाईलही बंद होता. पण त्यावरील यापूर्वी झालेल्या कॉल्सचा अभ्यास करून आम्ही त्याच्या बहिणीची माहिती मिळविली. तिलाही त्याच्याबद्दल माहिती नव्हती. नंतर आमच्या खबऱ्यांमार्फत माहिती मिळवली.
सोमवारी दीपक मालाड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून त्याला अटक केली. दीपकने चोरलेल्या रकमेपैकी २२ लाख रुपये आणि गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ठाकूरला १७ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.