मुंबई : ‘मेट्रो २ ए’ आणि ‘मेट्रो ७’ या मार्गिकेवर धावणाऱ्या रेल्वेगाडय़ांपैकी स्वदेशी बनावटीची पहिली चालकविरहित मेट्रो गाडी सज्ज झाली असून, नगरविकास मंत्री आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी भारत अर्थ मुव्हर्स (बीईएमएल) बंगळूरु येथे पाहणी केली. मे २०२१पासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत येईल, अशा पद्धतीने नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘मेट्रो २ ए’ (डीएन नगर ते दहिसर) आणि ‘मेट्रो ७’ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या दोन मार्गिकांचे काम वेगाने सुरू असून यासाठी ५७६ डबे निर्मितीचे काम बीईएमएल बंगळूरु येथे सुरू आहे. यातील पहिली रेल्वेगाडी तयार झाली असून २२ जानेवारीला ती मुंबईच्या दिशेने रवाना होईल आणि २७ ते २८ जानेवारीपर्यंत चारकोप येथील मेट्रो डेपोत दाखल होईल.
‘मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या उपनगरी रेल्वेला मेट्रोमुळे सक्षम पर्याय मिळेल आणि लाखो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुखकर होईल. मुंबई आणि महानगर परिसरात ३३७ किमीचे मेट्रोचे काम सुरू असून करोनामुळे या कामांचा वेग काहीसा मंदावला होता. मात्र आता ही कामे पुन्हा जोमाने सुरू असून निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहे,’ असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मेट्रो डब्यांची बांधणी देशांतर्गत झाल्यामुळे प्रत्येक डब्यामागे दोन कोटी रुपयांची बचत झाली आहे.
गाडीची वैशिष्टय़े
* या मेट्रो गाडीचे तंत्रज्ञान स्वयंचलित असून सुरुवातीच्या काळात त्या मोटरमनसह धावतील.
* प्रवाशांना मदत मागण्यासाठी प्रत्येक डब्यात विशेष बटन. इंटरनेटची सुविधा असेल.
* प्रत्येक डब्यात सायकल आणि अपंगांची चाकाची खुर्ची ठेवण्यासाठी सुविधा असेल.
* पहिल्या सहा रेल्वेगाडय़ा सहा महिन्यांत दाखल होणार असून, दर महिन्याला तीन याप्रमाणे उर्वरित गाडय़ा पुढील तीन वर्षांत येतील.
८० किमी प्रति तास मेट्रो मार्गिकेवर गाडीची कमाल वेग मर्यादा असेल.
३८० प्रवासी प्रत्येक डब्याची क्षमता (५२ बसून, ३२८ उभे राहून).
२,२८० प्रवाशांचा प्रवास एका रेल्वेगाडीतून एका वेळी शक्य .
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2021 1:58 am