देशात सर्वत्र स्मार्ट सिटीची चर्चा सुरू असताना आधीच स्मार्ट असणाऱ्या मुंबईकरांकडून यंदा नववर्षांच्या स्वागतासाठी एका अनोख्या सेवेचा आधार घेतला जाणार आहे. नववर्षांचे स्वागत आणि मद्य हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून रुढ झाले आहे, मात्र मद्यसेवन करुन गाडी चालवण्याचे दुष्परिणाम ठळकपणे समोर आल्याने तसेच कायद्याची भीती असल्याने वर्षअखेरीची पार्टी उरकून घरी कसे जायचे, हा उत्साही तळीरामांपुढे यक्षप्रश्न असतो. मुंबईकरांची हीच गरज लक्षात घेऊन शहरात अनेक कंपन्यांनी ‘वाहन चालक सेवा’ सुरू केली असून या कल्पनेला नाताळापासून नववर्षांपर्यंत चांगला प्रतिसाद मिळण्याचे संकेत आहेत. शहरात नाताळच्या आगमनापासून ते नववर्ष उजाडेपर्यंत रेस्टॉरंट, हॉटेल, क्लब आणि बारमध्ये विविध पाटर्य़ाचे आयोजन केले जाते. गेल्या १० वर्षांत हे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यात मोठय़ा प्रमाणात तरुण-तरुणींचा सहभाग असतो. अशा पार्टीत दारूचे सेवन मोठय़ा प्रमाणात केले जाते. मात्र दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवणे म्हणजे स्वत:च्या आणि इतरांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशी प्रकरणे सध्या शहरात गाजत असल्याने या गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत नाताळ काळात मनसोक्त मद्यपान केल्यानंतर सुखरूप घरी परतण्यासाठी अनेक जण ‘वाहनचालक सेवे’ची मदत घेत असल्याचे सामाजिक विषयाचे अभ्यासक स्वप्निल गोसावी यांनी सांगितले. याशिवाय वाहतूक पोलीसही या काळात वाहनचालकांची कसून चौकशी करत असतात. त्यामुळे लोक पार्टीला जरी गेले तरी सोबत वाहनचालकाला घेऊन जात असल्याचे गोसावी यांनी सांगितले.
सध्या मुंबई व उपनगरात वांद्रा, अंधेरी आणि दादर भागात ‘वाहनचालक सेवा’ पुरवणाऱ्या कंपन्या वाढत आहेत. या कंपन्यांची संकेतस्थळे आणि दूरध्वनी क्रमांक गुगलवर उपलब्ध आहेत. त्यांना संपर्क केला असता ग्राहकाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि सुरक्षेसाठी एक पासवर्ड पुरविला जातो. आठ तासांचे ६०० रुपये आकारले जातात. त्यानंतर वाढत जाणाऱ्या प्रत्येक तासासाठी ५० रुपये अधिक मोजावे लागतात. यात रात्री ११ नंतर वाहनचालकाला त्याच्या परतीच्या प्रवासासाठी ७५ रुपये अधिक द्यावे लागतात. या कंपनीत नोकरी करत असलेल्या वाहनचालकांकडे किमान पाच ते सहा वर्षांचा अनुभव असतो, तसेच त्यांच्याकडे कंपनीचे ओळखपत्रही असते. याशिवाय कंपनीकडे त्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध असते. एकटी महिला प्रवास करत असल्यास दूरध्वनीद्वारे तिच्या संपर्कात राहिले जाते, असे अंधेरीच्या वाहनचालक सेवा पुरविणाऱ्या एका कंपनीकडून सांगण्यात आले.

ही सेवा
कशी चालते?
दूरध्वनीद्वारे किंवा संकेतस्थळावर नाव व दूरध्वनी क्रमांक नोंदवावा लागतो. त्यानंतर तारीख, वेळ आणि वाहनचालक किती तासांसाठी अपेक्षित आहे. वाहनचालकाला कुठून कुठपर्यंत गाडी चालवायची आहे. ही माहिती सांगावी लागते. त्यानंतर वाहनचालक तुम्हाला संपर्क साधतो. त्याच्याजवळ कंपनीचे ओळखपत्र आणि पासवर्ड तुम्हाला सांगण्यात येतो. या सेवेचे फी क्रेडिट कार्डद्वारे अथवा रोख भरण्याची सोय कंपन्यांकडे असते, असे सांगण्यात आले.