ड्रायव्हिंग लायसन्स ही सध्या काळाची गरज झाली आहे. दुचाकी चालवणे आणि त्याचा परवाना असणे ही अत्यावश्यक गोष्ट आहे. मात्र आता हे काहीसे कठीण झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. कायम वाहन परवान्याची परीक्षा देणाऱ्यांपैकी १० टक्के लोक या परीक्षेत नापास होतात. वाहन चालविण्याचे पुरेसे प्रशिक्षण नसल्याने आणि नियमांबाबतचे योग्य ते ज्ञान नसल्याने असे घडत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. तर २५ टक्के लोक हे शिकाऊ वाहन परवान्याच्या परीक्षेत नापास होतात. आम्ही कोणत्याही परीक्षार्थीला वाहन परवानाच्या बाबतीत सौम्यतेची वागणूक देत नसल्याचेही यामध्ये नोंदविण्यात आले आहे. जे योग्य पद्धतीने गाडी चालवतात त्यांनाच आम्ही वाहन परवाना देतो असे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिकाऊ वाहन परवान्याची परीक्षा कॉम्प्युटराईज्ड असल्याने यामध्ये चिटींग करण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे प्रत्यक्ष नियम माहित असणाऱ्यांनाच हे लायसन्स देण्यात येते. साधारण दिवसाला ४०० लोक लायसन्स काढण्यासाठी येतात. ६ महिन्याचा शिकाऊ वाहन परवाना मिळाल्यानंतर त्यांना कायम वाहन परवान्याची चाचणी द्यावी लागते. पूर्वी लोकांना अगदी सहज लायसन्स मिळत होते. त्यामुळे रस्त्यावर अपघाताने मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त होती. मात्र आता जास्त कडक पद्धतीने परीक्षा घेतल्या जात असल्याने तसेच त्यात पारदर्शकता आल्याने लायसन्स मिळणे काहीसे अवघड झाल्याचे जी.आर.व्होरा या वाहतुकीशी संबंधित काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

परदेशात ड्रायव्हिंगलायसन्स मिळणे जास्त अवघड आहे असे एका वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले. लंडनमध्ये डायव्हिंग लायसन्सच्या परीक्षेत केवळ ४७ टक्के नागरीक पास होतात, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये या परीक्षेत पास होणाऱ्यांचे प्रमाण काही वर्षांपूर्वी ३९ टक्के होते. राज्या वाहतूक विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार आता ही परीक्षा आपल्याकडे ऑनलाइन केल्याने ती काही प्रमाणात ताकदवान झाली आहे, त्यामुळेच लायसन्स मिळणाऱ्यांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे.