गैरप्रकारांना आळा बसणार; राज्यात ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

वाहनचालकांना ऑक्टोबर २०१९ पासून चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) नव्या रूपात मिळणार आहे. त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने क्यू आरकोडसह अन्य नवी माहितीही असेल.

बनावट परवान्यांसह अन्य गैरप्रकारांना आळा बसावा आणि चालकाची वैयक्तिक माहितीही सुरक्षित राहावी यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार परवान्यात बदल केले जाणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. सुरक्षिततेसाठी चालकाची सर्व माहिती एका चिपबरोबरच क्यू आर कोडमध्येही साठविली जाईल. त्यात चालकाचा आपत्कालीन संपर्क क्रमांक असे. त्याचबरोबर अन्य काही माहितीतही बदल होतील.

चालक परवान्यावर चालकाचे एक मोठे छायाचित्र आणि त्याखालीच लहान आकाराचे छायाचित्र असते. याशिवाय चालकाचे नाव, त्याचे वडील, पत्नी किंवा मुलगा, मुलगी यापैकी एकाचे नाव, घरचा पत्ता, वाहन परवाना क्रमांक, परवाना मिळाल्याची तारीख, त्याची अंतिम मुदत इत्यादी माहिती असते. याशिवाय परवानाधारकाची माहिती असलेली एक चिपही परवान्यावर असते. त्याच्या मागील बाजूस वाहन कोणत्या प्रकारातील आहे, याची वाहनांच्या वर्गीकरणासह थोडक्यात माहितीही असते.

बनावट परवान्यांची आणि त्यांच्या गैरवापराची प्रकरणे उजेडात येत असल्याने त्यांना आळा बसावा यासाठी परवान्याच्या मांडणीतच बदल करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला. आता त्याची अंमलबजावणी देशभरात आणि महाराष्ट्रात ऑक्टोबरपासून केली जाणार आहे.

चिप की क्यूआर कोड?

परवान्यावर चिप आणि क्यूआर कोड दोन्ही आवश्यक आहे की एकच याचा निर्णय केंद्राने राज्य परिवहन विभागांवर सोपविला आहे. सध्याच्या परवान्याच्या मागील बाजूस फक्त वाहनांच्या वर्गीकरणाची माहिती लघुस्वरुपात दिली जाईल. केवळ वर्गीकरण न देता त्याची अंतिम मुदतही असेल. मागील बाजूला चालकाचा आपत्कालीन संपर्क क्रमांकही असेल. सध्याच्या परवान्यावर तो नसतो. हा परवाना लॅमिनेट केलेला असेल.

परवाना बनावट की अस्सल?

परवान्याच्या चिपमध्येही बदल करण्यात येतील. चिपबरोबरच क्यूआर कोडही असल्यास ते अधिक सुरक्षित असेल. परवानाधारकांवर कारवाई करताना त्यातील माहिती परिवहन अधिकाऱ्यांना मिळावी यासाठी त्यांना एक उपकरणही देण्यात येणार आहे. त्याद्वारे अधिकाऱ्यांना माहिती वाचता येईल आणि परवाना बनावट आहे की अस्सल, त्याचीही माहिती मिळेल.

वाहनचालकांना नवीन परवाना ऑक्टोबरपासून मिळेल. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याच्या मांडणीत बदल केले जातील. चालकाची माहिती क्यूआर कोडमध्येही असेल. नवीन परवान्यावर चिप असेल की क्यूआर कोड, याचा निर्णय लवकरच घेऊ.   – शेखर चन्नो, परिवहन आयुक्त

नवा परवाना असा..

  • रंगसंगती आणि माहितीतही बदल
  • परवान्यावर चालकाचे एकच छायाचित्र
  • माहितीची चिप परवान्याच्या मागील बाजूस
  • क्यूआर कोड मागील बाजूस..चालकाची माहिती अधिक सुरक्षित