नव्या वाहन नियमावलीमुळे प्रवासी आणि मालवाहतूकदारांसमोर डोकेदुखी

मुंबई : वाहनचालक परवान्याची वैधता संपल्यास एक वर्षांच्या आत त्याचे नूतनीकरण करा, अन्यथा पुन्हा चाचणी द्या, अशी अट प्रवासी आणि अवजड मालवाहतूकदारांसाठी नवीन केंद्रीय मोटर वाहन कायद्यात घालण्यात आली आहे. यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाबरोबरच (आरटीओ) चालकांना मोटर ड्रायव्हिंग स्कूलकडूनही पाच किलोमीटरची चाचणी द्यावी लागणार आहे. या अटीला मालवाहतूकदार व प्रवासी बस संघटनांनी विरोध केला आहे.

प्रवासी आणि अवजड मालवाहतूक वाहनचालकांच्या परवान्याची वैधता तीन वर्षे होती. वैधता संपल्यानंतरही दोन वर्षांपर्यंत नूतनीकरणाची मुभा होती. नूतनीकरण करताना त्या चालकाला फक्त आरटीओत येऊन चाचणी द्यावी लागत होती.

मात्र आता नवीन नियमानुसार परवान्याची वैधता ही पाच वर्षांची करण्यात आली आहे. वैधतेचा कालावधी जरी वाढवला असला तरी नूतनीकरणासाठी मात्र अजब अट घालण्यात आली आहे.

पाच वर्षांची वैधता संपल्यानंतर एका वर्षांच्या आत परवान्याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. एक वर्षांनंतर नूतनीकरणासाठी आरटीओकडे गेल्यास त्या चालकाला पुन्हा चाचणी द्यावी लागेल. त्याआधी मोटर ड्रायव्हिंग स्कूलमधूनही ‘पाच ए’ अर्ज घेऊन तो भरण्याबरोबरच पाच किलोमीटरची चाचणी द्यावी लागेल. यात इंधन बचत केल्याचेही दाखवावे लागेल. त्यानंतर ‘पाच ए’ अर्ज घेऊन चालकाला तो आरटीओकडे सादर करावा लागणार आहे आणि पुन्हा चाचणी द्यावी लागणार असल्याची माहिती, आरटीओतील सूत्रांनी दिली. सप्टेंबर महिन्यापासूनच या नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा नियम का केला हेच कळत नाही. नियम नवीनच असल्याने अद्याप याबाबत चालकाला मनस्ताप झाल्याचे आढळलेले नाही. परंतु नूतनीकरणावेळी मोटर ड्रायव्हिंग स्कूलकडून चालकाला आर्थिक भरुदड पडू शकतो, असे मुंबई बसमालक संघटनेचे सरचिटणीस हर्ष कोटक म्हणाले.

अवजड वाहनांसाठी परवान्याची वैधता पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर नूतनीकरण एक वर्षांच्या आत न केल्यास पुन्हा चाचणी द्यावी लागेल. हा नियम लागू झाला असून त्यामुळे चालकाला कोणताही भरुदड पडणार नाही व तसा भरुदड पडल्याचे ऐकिवातही नाही.    – शेखर चन्ने, परिवहन आयुक्त