आचरट मागण्या घेऊन येणाऱ्या ‘अभ्यागतां’मुळे मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी बेजार

आपल्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री कार्यालयालाच वेठीला धरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तिघांनी मंगळवारी अधिकाऱ्यांची झोप उडवली होती. बुधवारी नव्या चेहऱ्यांनी या नाटय़ात प्रवेश केला. यातील एका उचापतखोराला तर, ‘शांततेचे नोबेल’ पाहिजे आहे. ते मिळावे म्हणून मंत्रालयात खेटे घालणारा हा महाभाग एवढा उतावीळ झाला, आणि त्याचा संयमच संपला. ‘पुरस्काराची शिफारस करा, नाही तर काल काय झाले माहीत आहे ना’, अशी धमकी देत या ‘शांततादूता’ने पोलीस आणि कर्मचाऱ्यांशी भांडणच पुकारले.. अशा महाभागांना कसे आवरायचे या चिंतेने आता ‘सहाव्या मजल्या’ची झोप उडाली आहे.

आपल्या मागण्या मार्गी लागत नाहीत म्हणून दिलीप मोरे या शेतकऱ्याने मंगळवारी मुख्यमंत्री दालनाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याची चर्चा सुरू झाली आणि मागण्या मार्गी लावण्याचा जणू उपाय सापडल्याचा आनंदच अनेकांना झाला.

बुधवारी मुख्यमंत्री कार्यालयात चोख पोलीस बंदोबस्त होता. येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी सुरू असतांनाच लातूरचा पाटील नावाचा एक गृहस्थ तेथे आला. ‘काय काम आहे, कोणाकडे जायचे आहे’ अशी चौकशी पोलिसांनी  करताच त्याचा पारा चढला. ‘काल काय घडले माहीत आहे ना? दीड वर्षांपासून पाठपुरावा करतोय, पण माझे काम झालेले नाही,’ असे म्हणत त्याने सुरक्षा अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. शेवटी नमते घेऊन पोलिसांनी त्याला मुख्यमंत्री कार्यालयात सोडले.

पाटील यांच्याप्रमाणेच तहसिलदार पदावरून निवृत्त झालेल्या पुण्यातील एका महिलेची मागणीही अजबच आहे. या महिलेने अतिप्रिय मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्याशी संवाद साधणारे लांबलचक पत्र पाठविले आहे. फ्लॅट संस्कृती चुकीची असून आपल्याला पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी मुख्यमंत्री कोटय़ातून तीन चार खोल्यांचे बैठे घर द्यावे, अशी विनंती तिने केली आहे. या मागणीचा महिलेकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असून तिचे समाधान करतानाही अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत.

अशाच प्रकारे कल्पनेच्या पलिकडील मागण्या घेऊन आठवडय़ातून किमान चारजण तरी मंत्रालयात येतात, आणि आपली मागणी पूर्ण करा, असा हट्टच धरतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या मागण्यांची पूर्तता कशी करायची किंवा त्यांची समजूत कशी घालायची, याचा खल सध्या मुख्यमंत्री कार्यालयात सुरू आहे.

जागतिक पुरस्कारासाठी खेपा!

लातूरचे पाटील यांना शांततेसाठीचे नोबेल हवे आहे. त्यासाठी त्यांनी मंत्रालयातील अनेक मंत्र्यांची शिफारस पत्रेही मिळविली आहेत. आता त्यांना केवळ मुख्यमंत्र्यांची शिफारस हवी आहे. त्यासाठी दीड वर्षे ते मुख्यमंत्री कार्यालयात सातत्याने खेपा मारत असतात. पाटील नेहमी येऊन मुख्यमंत्र्यांनी आपला  प्रस्ताव पाठवावा असा आग्रह धरतात, पण त्यांना कसे समजावयाचे असा प्रश्न पडल्याची कैफियत मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मांडली.