News Flash

राज्यात ३० हजार गावांमध्ये दुष्काळ

राज्यातील ३३ जिल्हय़ांतील एकूण ४४ हजार गावांपैकी तब्बल २९ हजार ६०० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे.

तब्बल १० हजार गावांना टँकरने पाणीपुरवठा; उपाययोजनांचा सरकारवर बोजा पडणार 

राज्यातील ३३ जिल्हय़ांतील एकूण ४४ हजार गावांपैकी तब्बल २९ हजार ६०० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. राज्य सरकार आता या गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थितीऐवजी दुष्काळ जाहीर करणार आहे. पावसाच्या आगमनापर्यंत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी विविध उपाययोजना कराव्या लागणार असून त्याचा आणखी आर्थिक बोजा राज्य सरकारवर पडणार आहे. या पाश्र्वभूमीवर ९०० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

मराठवाडय़ातील परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. या भागातील धरणांमध्ये केवळ २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या दहा हजारांहून अधिक दुष्काळग्रस्त गावांना पाच हजार टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे.

राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भात एच. एम. देसरडा व डॉ. संजय लाखे-पाटील यांनी उच्च न्यायालयात स्वतंत्र जनहित याचिका दाखल केल्या होत्या. केंद्र सरकारच्या २००५ च्या आपत्ती व्यवस्थापन कायदानुसार व २००९ च्या दुष्काळ मॅन्युअलप्रमाणे राज्य सरकार दुष्काळी परिस्थिती हाताळत नसल्याने आपत्तीग्रस्तांना मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याचे डॉ. लाखे-पाटील यांचे म्हणणे होते.

राज्य सरकार आता टंचाईसदृश गावांमध्ये दुष्काळ जाहीर करणार आहे, त्यासंबंधीचा शासन आदेश लवकरच जारी केला जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव अशोक आत्राम यांनी दिली. राज्यातील सर्व धरणांतील मिळून केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील ४०३३ गावे व ६५४८ वाडय़ांना ५१५९ टँकरमार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 3:37 am

Web Title: drought in 30 thousand villages in maharashtra 2
Next Stories
1 राष्ट्रवादीला काँग्रेसची साथ हवी!
2 राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला रोखण्यासाठीच भाजपची खेळी
3 नगराध्यक्ष निवड थेट जनतेकडून!
Just Now!
X