राज्यातील काही भागामध्ये दुष्काळामुळे तीव्र पाणीटंचाई असल्याने जुलैपर्यंत जलतरण तलावाच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, असे आदेश सर्व महापालिकांना देण्यात आले आहेत, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितले.
दुष्काळामुळे लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लोकांना दूरवरून पाणी आणावे लागते आहे. त्याचवेळी शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही अत्यल्प साठा शिल्लक असल्याने तेथेही पाणीटंचाई आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात पाण्याचा तुटवडा असल्याने सर्वांनीच पाण्याचा जपून वापर केला पाहिजे, असे महाजन यांनी सांगितले. त्यासाठीच पाण्याचा अपव्यय होणाऱ्या सर्व गोष्टींवर तात्पुरती बंदी घालण्यासाठी राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा यांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रेनडान्ससारखे मनोरंजनाचे प्रकार आणि जलतरण तलावाच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, असे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.