एफडीएच्या हेल्पलाइनवर फक्त तीन तक्रारी

केंद्र सरकारच्या ई-पोर्टल या योजनेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने मंगळवारी पुकारलेला संप अन्न व औषध प्रशासनाच्या सजगतेमुळे राज्यात फारसा यशस्वी होऊ शकला नाही. संपूर्ण दिवसभरात औषधे उपलब्ध न झाल्याच्या फक्त तीन तक्रारी प्रशासनाच्या हेल्पलाइनवर आल्याचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. या काळात सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून खासगी, शासकीय व निमशासकीय रुग्णालयांना पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे तक्रारी आल्या नाहीत, असा दावा त्यांनी केला.

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पूर्वीपासूनच ऑनलाइन फार्मसीला विरोध केला आहे. यामध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिली जात असून झोपेच्या गोळ्या किंवा तत्सम धोकादायक औषधांची विक्री केली जाते अशा तक्रारी संघटनेकडून करण्यात आल्या होत्या. यावर उपाययोजना म्हणून केंद्राने देशातील सर्वच विक्रेत्यांसाठी ई-पोर्टल सुरू करण्याचे जाहीर केले. मात्र याला संघटनेने विरोध दर्शविला आणि संपाचे पाऊल उचलले. या संपात राज्यातील ३० हजार तर देशातील साडेआठ लाख औषधे विक्रेते सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र संपकऱ्या विक्रेत्यांमध्ये फूट पडली होती. फार्मास्टिस्ट संघटनेशी संलग्न असलेल्या औषध विक्रेत्यांनी संपामध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नागरिकांना औषधे उपलब्ध होण्यात कुठलीही अडचण आली नाही, असेही डॉ. कांबळे यांनी सांगितले. ऑनलाइन फार्मसीबाबत तयार करण्यात आलेल्या समितीचे डॉ. कांबळे हे अध्यक्ष असून त्यांनी याधीच याबाबतचा अहवाल केंद्राला सादर केला आहे. नागरिकांना औषध मिळण्याबाबत भविष्यात अडचण आल्यास १८००२२२३६५ (टोल फ्री) या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याशिवाय ०२२-२६५९२३६२, २६५९२३६३, २६५९२३६४ व २६५९२३६५ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन डॉ. कांबळे यांनी केले आहे.