25 September 2020

News Flash

अमली पदार्थाची ‘सुलभ’ विक्री

पश्चिम उपनगरातील शौचालयात दडवलेला ‘एमडी’ या अत्यंत घातक अमली पदार्थाचा अडीज किलो साठा एटीएस पथकाने हस्तगत केला.

वांद्रे येथील सुलभ शौचालयातून एक कोटीचे एमडी हस्तगत; एटीएसची कारवाई

शहरातील सुलभ शौचालये अमली पदार्थाची गोदामे आणि विक्री केंद्रे बनल्याचे संकेत राज्य दहशतवादविरोधी पथकाला(एटीएस) मिळाले आहेत. पश्चिम उपनगरातील शौचालयात दडवलेला ‘एमडी’ या अत्यंत घातक अमली पदार्थाचा अडीज किलो साठा एटीएस पथकाने हस्तगत केला.

गेल्या आठवडय़ात एटीएसने तळोजाजवळील वलप गावातील एमडी निर्मितीच्या कारखान्यावर छापा घालत या अमली पदार्थाची निर्मिती, वितरण, वाहतूक करणारी साखळी उद्ध्वस्त केली. या कारवाईत पाच जणांना अटक करून गजांआड केले. त्यांच्याकडे १२९ किलो एमडीचा साठा आणि एक कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. एटीएसने निर्मिती, वितरण, वाहतूक साखळी उद्ध्वस्त केल्यानंतर एमडीची किरकोळ विक्री करणाऱ्या टोळ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

अटक आरोपींपैकी जितेंद्र परमार ऊर्फ आसीफ हा या साखळीचा प्रमुख असल्याची माहिती पुढे आली आहे. मत्स्य प्रजोत्पादनाच्या व्यवसायाआड परमारने वलप गावात एमडी निर्मितीचा सुसज्ज कारखाना सुरू केला. कारवाईदरम्यान एटीएसला तेथे अद्ययावत यंत्रसामग्री आढळली. परमारच्या अन्य एका साथीदाराचा शोध एटीएसकडून सुरू आहे. हे दोघे कारखान्यात तयार झालेले एमडी मुंबईसह राज्यातील बडय़ा वितरकांना विकत होते. वितरकांकडून हा साठा किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचत होता. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांकरवी परमारच्या कारखान्यात तयार होणारे एमडी अन्य ग्राहकांना विकले जात होते.

किरकोळ विक्रेत्यांपैकी अनेकांनी एमडी साठा त्या त्या वस्त्यांमधील सुलभ शौचालयांमध्ये दडवून ठेवल्याची माहिती एटीएसला मिळाली. वांद्रे परिसरातील एका शौचालयाच्या झाडाझडतीतून या माहितीत तथ्य आढळले. तेथे दडवलेला, साठवलेला अडीज किलो एमडी साठा सापडला. या साठय़ाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.

शोध सुरू

सुलभ शौचालयांची देखभाल, साफसफाई करण्यासाठी कंत्राटदार ज्या व्यक्तींची नेमणूक करतो, त्यांना या टोळीने हाताशी धरल्याचा संशय एटीएसला आहे. वस्त्यांमधील, रस्त्याकडेला असलेल्या शौचालयांकडे पोलिसांचे फारसे लक्ष नसते. त्यामुळे तेथे विक्री व्यवसाय सुलभ होऊ शकतो, हा त्यामागील हेतू असावा, असा संशय एटीएसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 2:31 am

Web Title: drug narcotics anti terrorism squad akp 94
Next Stories
1 बनावट घडय़ाळे बनवणाऱ्या कंपनीवर छापा
2 सीबीटीसी सिग्नल यंत्रणेसाठी एमआरव्हीसी सल्लागार नियुक्त
3 ‘एसआयईएस’ शाळेत इस्रोच्या कार्याचा आढावा
Just Now!
X