22 September 2020

News Flash

करोडपती ‘ड्रगमाफिया’ बेबी..

‘म्याव-म्याव’ म्हणून परिचित असलेले मेफ्रेडॉन हे ‘नारकोटिक्स ड्रग्ज अ‍ॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्या’अंतर्गत आणण्यास फेब्रुवारी २०१५ मध्ये मंजुरी मिळाली आणि मुंबई पोलीस ‘बेबी’च्या मागावर निघाले.

‘म्याव-म्याव’ म्हणून परिचित असलेले मेफ्रेडॉन हे ‘नारकोटिक्स ड्रग्ज अ‍ॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्या’अंतर्गत आणण्यास फेब्रुवारी २०१५ मध्ये मंजुरी मिळाली आणि मुंबई पोलीस ‘बेबी’च्या मागावर निघाले. मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल धर्मराज काळोखेनेही जबानीत ‘बेबी’चे नाव घेतल्यानंतर पोलीस अधिकच सक्रिय झाले आणि दीड महिना गुंगारा देणाऱ्या बेबीला अटक करून वरळीतल्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीतील दूधविक्रेती ते ‘ड्रगमाफिया’ असा विचित्र प्रवास करणाऱ्या बेबीचे ३० वर्षांचे साम्राज्य उद्ध्वस्त झाले.
अमली पदार्थ तस्कर बेबी पाटणकरला अटक
शशिकला ऊर्फ बेबी रमेश पाटणकर, पूर्वाश्रमीची शशिकला माजगावकर १९८५ पर्यंत दुधाच्या बाटल्या विकत असे. दुधापेक्षा अमली पदार्थाच्या विक्रीतून अधिक पैसे मिळतात, असे लक्षात येताच बेबीने मुंबईल्या महाविद्यालयांबाहेर गांजा, हशीष विक्रीचा धंदा सुरू केला व त्यात चांगलाच जम बसवला. राजस्थानमधील भवानी मंडी ते मध्य प्रदेशातील रतलाममधून ती ब्राऊन शुगर आणू लागली. याच काळात कॉन्स्टेबल काळोखे तिला भेटला आणि अमली पदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा वापर ती करू लागली. बेबीसाठी काळोखे पोलिसांच्या गाडीतूनही अमली पदार्थाची वाहतूक करू लागला.
२००२ पर्यंत ड्रगमाफिया म्हणून वावरणारी बेबी त्यानंतर पोलिसांची खबरी बनली. राजस्थान, मध्य प्रदेशातून आणलेल्या ब्राऊन शुगरमध्ये स्वत:च भेसळ करून तो माल बनावट असल्याचे भासवत असे. हा माल परत करण्याच्या बहाण्याने तिने पोलिसांना अनेक ड्रगपुरवठादार पकडून दिल्यामुळे ती एका हायप्रोफाइल चकमकफेम अधिकाऱ्याची खास खबरी बनली. त्यामुळे पोलिसांमध्येही तिचा बोलबाला होता. याच जोरावर तिची दोन्ही मुले, सतीश आणि गिरीश तसेच मुलगी, सून असा सारा परिवारच अमली पदार्थाच्या धंद्यात स्थिरावला.
याच धंद्यामुळे नवरा रमेश पाटणकर याच्याशी न पटल्याने वेगळी झालेली बेबी सिद्धार्थनगरातच उंचावर एका टोकाला झोपडी विकत घेऊन राहू लागली. गेल्या काही वर्षांत ‘म्याव-म्याव’चे प्रस्थ वाढल्याने बेबीने पुन्हा त्याकडे मोर्चा वळविला. काळोखेकडे सापडलेले १३२ किलो म्याव-म्याव बेबीनेच त्याला ठेवायला दिले होते. खरे तर काळोखे डोईजड झाल्यामुळे त्याची सुपारीही बेबीनेच दिल्याची पोलिसांना ठाम खात्री आहे. काही वर्षांपूर्वी उपअधीक्षक ढवळे यांनाही तिने अशाच पद्धतीने टीप देऊन पकडून दिले होते.

बेबीची मालमत्ता..
या धंद्यातून बेबीने बख्खळ कमाई केली. वरळीतील सिद्धार्थनगरात १० झोपडय़ा, गोराई बीच येथे बंगला, लोणावळ्यात बंगला, पुण्यात कोरेगाव पार्क येथील आलिशान गृहसंकुलात एक मजला, वाइन शॉप, तीन बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ४० लाख रुपये, कोकणात घरे, आलिशान गाडय़ा अशी माया गोळा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 3:18 am

Web Title: drug peddler baby patankars asset
Next Stories
1 लोकलमधील जादा प्रवाशांबाबत उच्च न्यायालयाचा सवाल
2 चित्रपटात रेल्वेप्रतिमा वापरण्यासाठी रॉयल्टी?
3 विकास आराखडय़ातील चुकांबाबत मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश
Just Now!
X