विधानसभेतील शोकप्रस्तावात आरोग्यावर चर्चा 

डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोक प्रस्तावाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करतानाच मुद्दा आरोग्य चर्चेकडे वळाला. राज्यात अलीकडच्या काळात कर्करुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे आपल्या सेवनात काय येत आहे याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, या मुद्दयावर लक्ष वेधून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी  फळे- भाजीपाला- पिकांवर फवारल्या जाणाऱ्या औषधांवरही मर्यादा घालावी अशी मागणी केली. येवढेच नव्हे तर या र्निबधासाठी कायदा करण्यात यावा अशी ठोस भूमिका घेतली.

राज्यात काही महिन्यांपूर्वी किटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बाजारात-मॉलमध्ये विकत घेतली जाणारी शेतीउत्पादने किटकनाशकांपासून मुक्त आहेत का, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला करीत गेल्या आठवडय़ात नव्या चर्चेला वळण दिले होते.

आता विधानसभेतच सोमवारी कर्करोगाचा संबंध किटकनाशक आणि औषध फवारणीशी लावण्यात आला.

जयंत पाटील यांनी पतंगरावांच्या कारर्कीदीचा आढावा घेताना त्यांना झालेल्या कर्करोगाचा उल्लेख करीत सभागृहामध्ये या आजारावर चर्चा घडवून आणण्याची गरज व्यक्त केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम आणि माजी मंत्री आर.आर. पाटील यांचेही कर्करोगानेच निधन झाले आहे. राज्यात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असल्यामुळे आपली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, भाजीपाला तसेच पिकांवर फवारली जाणारी किटकनाशके यावर सखोल चर्चा होण्याची आवश्यकता आहे.

नागरिक अनभिज्ञच

बाजारात येत असलेली फळे आणि भाज्या या रासायनिक प्रक्रिया केलेल्या आहेत की नाही याची चाचणी करण्याबाबत सरकार आणि पालिका फारशी गंभीर नसल्याची बाब उघड झाल्यामुळे  न्यायालयाने दोन्हींना यापूर्वीच धारेवर धरले आहे.  तसेच रासायनिक प्रक्रिया झालेली फळे-भाज्या बाजारात येऊ नये यासाठी काय उपाययोजना करत असल्याचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेमार्गालगत लावल्या जाणाऱ्या भाजीपाल्याच्या सुरक्षेबाबत विविध संस्थांनी वेळोवेळी ओरड केली आहे. तरीही याबाबत कोणतीही उपाययोजना होत नाही. ग्राहकांना कोणत्या भाज्या असुरक्षित आहेत आणि कोणत्या सुरक्षित याचा पत्ता लागत नाही.

दररोज सकाळी आपण बाजारपेठेत ताज्या भाज्या पाहतो, मात्र या भाज्या तशा दिसाव्यात म्हणून त्यांच्यावर मद्यही शिंपडण्यात आले असण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर औषधे आणि किटकनाशके फवारली जात असतील, तर त्यावर र्निबध आणण्यासाठी कायदा करायला हवा.

जयंत पाटील, काँग्रेस गटनेते.