ना प्रवासाची परवानगी, ना लसीकरणाचा लाभ

मुंबई : अंशत: केलेल्या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवांमध्ये औषधालये सुरू राहणार असली तरी औषधालयांमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांची परवड होताना दिसत आहे. कोणत्याही वेळी लोकलमधील प्रवासाला नसलेली मुभा आणि संचारबंदीच्या काळात वावरण्यासाठी सर्वच कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याने कर्मचाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. औषध देण्याच्या निमित्ताने रुग्णांशी, रुग्णांच्या नातवाईकांशी सततचा संपर्क असल्याने लसीकरणाची मागणीही या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रेल्वे प्रवासाची, संचारबंदीच्या कालावधीतही फिरण्याची मुभा आहे. औषध विक्रेते, औषधालयांचे मालक यांना त्यांचे ओळखपत्र दाखवून प्रवासाची परवानगी मिळत असली तरी दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र अडचणी येत आहेत. कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याने त्यांना सर्वसामान्यांसाठी परवानगी असलेल्या १२ ते ४ या वेळेतच प्रवास करता येतो. त्यामुळे दुकानांमध्ये मदतनीस, कर्मचारी मिळत नसल्याचे औषध दुकानांच्या मालकांचे म्हणणे आहे.

‘दुकानांचे मालक किंवा परवानाधारक औषधविक्रेते (फार्मासिस्ट) त्यांच्या ओळखपत्रावर प्रवास करू शकतात. औषधालयात एका फार्मासिस्टच्या हाताखाली चार मदतनीस असतात. तेही वेळेवर पोहोचणे गरजेचे आहे. त्यांना कोणत्याही सुविधा किंवा हमी नसल्याने आज औषधालयांवर ताण असतानाही कर्मचारी मिळत नाहीत,’ असे औषधालयांच्या मालकांनी सांगितले.

‘शिथिलीकरणानंतर रेल्वे सुरू झाल्या असल्या तरी औषध सेवेतील पुरवठादार, औषधालये यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र रेल्वेने प्रवास करण्यास मुभा नाही. त्यांना दुचाकी किंवा वैयक्तिक वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन खर्चात भर पडली आहे. औषधालयात काम करताना दिवसभरात अनेक लोकांशी संपर्क येतो. त्यात बाधित रुग्णांचाही समावेश असू शकतो. त्यामुळे औषधालयातील कर्मचाऱ्यांचेही लसीकरण होणे गरजचे आहे,’ असे धारावी केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे विशाल माने यांनी सांगितले.

‘काही औषधे ही बर्फात ठेवावी लागतात. त्यासाठी पुरवठादारांना बर्फाची गरज असते किंवा अशी औषधे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ती बर्फातच न्यावी लागतात. पूर्वी या गोष्टी रेल्वेने सहज होत होत्या, परंतु आता मात्र इतर सुविधा शोधाव्या लागतात. हेच इतर औषधांच्या बाबतीत होते. मुंबईतला कर्मचारी दहिसरपर्यंत पुरवठा करतो, ठाण्यातला कर्मचारी कल्याणपर्यंत जातो. या लांबच्या प्रवासासाठी रेल्वेची मुभा आवश्यक असल्याचे पुरवठादारांचे म्हणणे आहे.’

औषध सेवेतील कर्मचाऱ्यांच्या अडचणी स्ंघटनांकडून मांडल्या जात आहेत. स्थानिक संघटनांनी किंवा औषधालयांनी एकत्र येऊन ओळखपत्र तयार करावे, प्रशासनाकडून त्याला मान्यता दिली जाईल आणि ते प्रवास करू शकतील. शिवाय कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हावे यासाठीही पाठपुरावा सुरू आहे. – डॉ. नितीन देवरे, विशेष कार्याधिकारी, अन्न व औषध प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाने औषध सेवेत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना एकसारखे ओळखपत्र देणे गरजेचे आहे. शिथिलीकरणानंतरही औषध सेवेत काम करणाऱ्यांना प्रवासात वारंवार अडचणी येत आहेत. सध्या टाळेबंदीसदृश वातावरण असल्याने प्रशासनाचे ओळखपत्र अविरत सेवा देण्यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच कर्मचाऱ्यांना रेल्वेत मुभा आणि लसीकरण प्रक्रियेत प्राधान्य मिळावे यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. – अभय पांडे, अध्यक्ष, ऑल इंडिया फूड अ‍ॅण्ड ड्रग असोसिएशन