औषध वितरकांची तब्बल १०३ कोटी रुपयांची देयके गेल्या दहा महिन्यांपासून थकीत असून वारंवार सूचना देऊनही ‘हाफकिन’ संस्थेने ती न दिल्याने अखेर जवळपास १०० औषध वितरकांनी सोमवारपासून पुरवठा बंद केला आहे.

आरोग्य विभागाने वेळीच कार्यवाही न केल्यास आणि पुरवठा खंडित राहिल्यास औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

औषध वितरकांनी थकीत देयके देण्यासाठी अनेकदा पाठपुरावा केला आहे. परंतु राज्य सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे पुरवठादारांनी नोव्हेंबरमध्ये औषध पुरवठा बंद आदोलन पुकारले. यावर ‘हाफकिन’ने नोव्हेंबरमध्ये सर्व थकीत बिले देण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी हा पुरवठा पूर्ववत केला गेला. परंतु आता डिसेंबर महिना आला तरी पैसे न दिल्याने सोमवारपासून पुन्हा एकदा औषध बंद आंदोलन पुरवठादारांनी सुरू केले आहे.

थकीत देयके देण्याचा इशारा पुरवठादारांनी शुक्र वारी दिला होता. परंतु ‘हाफकिन’ने यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव औषध पुरवठा बंद करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी माहिती ‘ऑल फूड अण्ड ड्रग लायसन्स होल्डर असोसिएशन’चे अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली.

राज्यातील १९ रुग्णालये आणि ३४ आरोग्य केंद्रांना करण्यात येणारा औषध पुरवठा बंद झाला असून अशीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास तुडवडा भासण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रुग्णांचे हाल होऊ शकतात.