28 October 2020

News Flash

हवाईमार्गाने अमली पदार्थाच्या तस्करीत वाढ

बंगळूरुमध्ये लग्नपत्रिकांमध्ये अमली पदार्थ दडवून आणल्याचेही समोर आले होते.

मुंबई : करोना प्रादुर्भावामुळे बहुतांश व्यवहारांवर मर्यादा आली असली तरी परेदशातून भारतात होणारी अमली पदार्थाची तस्करी मात्र सुरळीतपणे सुरू आहे. टाळेबंदीत प्रवासी विमानसेवा ठप्प झाल्याने तस्करीला चाप बसेल, असा अंदाज होता. मात्र एअर कागरेद्वारे तस्करीचे प्रमाण वाढल्याचा दावा केंद्रीय यंत्रणांकडून करण्यात आला आहे.

सप्टेंबर महिन्यात अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) दिल्ली विमानतळावरून १० किलो हेरॉइन, दीड किलो कोकेन, सहा किलो रसायनमिश्रित गांजा (क्युरेटेड मॅरिओना/बड) आदी अमली पदार्थ पकडले. हे सर्व पदार्थ कुरिअर सेवेमार्फत एअर कागरेद्वारे भारतात आलेल्या विविध वस्तूंच्या पार्सलमध्ये दडविण्यात आले होते. गेल्या आठवडय़ात धाग्याच्या रिळांमध्ये दडवलेले कोकेन हस्तगत करण्यात आले. तर त्याआधी पार्सलसाठी वापरलेल्या खोक्याच्या पुठ्ठय़ात चोरकप्पा तयार करून त्यातून हेरॉइन दडविल्याचे उघड झाले. याआधी बंगळूरुमध्ये लग्नपत्रिकांमध्ये अमली पदार्थ दडवून आणल्याचेही समोर आले होते.

टाळेबंदीआधी पैशांच्या आमिषाने काही व्यक्ती (वाहक/कॅरिअर) शरीरात, सोबत आणलेल्या सामानात दडवून अमली पदार्थ भारतात आणत होते. मुंबईसारख्या महत्त्वाच्या विमानतळावर बॉडी स्कॅनर नसल्याने सीमाशुल्क (कस्टम) विभागाची नजर चुकवून अनेक वाहक सोबत आणलेल्या अमली पदार्थासह सहज निसटत. मात्र टाळेबंदीत प्रवासी विमानसेवा बंद असल्याने एअर कागरेचा पर्याय तस्करांनी निवडल्याचे केंद्रीय यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे.

एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वीही मालवाहू जहाजातून, विमानातून अमली पदार्थाची तस्करी होत होती. मात्र त्याचे प्रमाण कमी होते. टाळेबंदीत हे प्रमाण वाढल्याचे अलीकडच्या काळात दिल्ली विमानतळावर करण्यात आलेल्या कारवायांमधून स्पष्ट होते. उत्तर अमेरिका, आफ्रिका खंडातील काही देशांमधून विविध वस्तूंच्या निर्यातीआड किंवा वस्तू, उपकरणांमध्ये चोरकप्पे तयार करून अमली पदार्थ भारतात पाठवले जात आहेत.

मुंबईतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नेमकी माहिती असल्याशिवाय तस्करी रोखणे कठीण असते. सोने किंवा अमली पदार्थाची खेप प्रवासात, विमानतळावर सुरक्षा यंत्रणांच्या हाती पडू नये यासाठी तस्करांकडूनही विशेष काळजी घेतली जाते. वस्तूंमध्ये तयार केलेले चोरकप्पे एक्सरे यंत्रातून दिसतातच असे नाही. ते पाहण्यासाठी बारकाईने तपसणी करणे आवश्यक असते. त्यात वेळ जातो. जास्त ताण असल्यास कर्मचारी आळस करतात. शिवाय आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये पीठ, औषधे किं वा रसायनांच्या भुकटीचाही समावेश असतो. त्याआडही अमली पदार्थाची तस्करी होऊ शकते.

समुद्रमार्गे.. : गेल्या महिन्यात महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) न्हावाशेवा बंदरात उतरलेला कंटेनर तपासला. त्यात ज्येष्ठमध असल्याचे सांगण्यात आले होते. डीआरआय अधिकाऱ्यांनी तपासणी केली तेव्हा त्यात ज्येष्ठमधच होते. मात्र त्यातील काही ज्येष्ठमधांच्या काडय़ांमध्ये हेरॉइन दडविल्याचे उघड झाले. या कारवाईत डीआरआयने एक हजार कोटी किमतीचे (आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य) १९१ किलो हेरॉइन हस्तगत केले. गेल्या वर्षी भंगार सामान म्हणून बंदरावर आलेला कं टेनर डीआरआयने तपासला तेव्हा बिनकामाचे लोखंड वाटावे, अशा तऱ्हेने कोटय़वधींचे सोने दडवून आणल्याचे समोर आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 3:18 am

Web Title: drug trafficking increased by air routes zws 70
Next Stories
1 आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे मुंबईत आंदोलन
2 Coronavirus : चार लाख मुंबईकर गृहविलगीकरणात
3 शासकीय कार्यालयांतील १०० टक्के उपस्थितीविरोधात आज आंदोलन
Just Now!
X