ऑनलाइन विक्रीला कायदेशीर मान्यतेस विरोध

केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ऑनलाइन औषधविक्रीच्या मसुद्याला विरोध करत ऑल इंडिया केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने २८ सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. त्यामुळे आज देशभरातील औषधे दुकाने बंद राहणार आहेत.

ऑनलाइन औषधविक्रीला कायदेशीर मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारने सुधारित मसुदा नुकताच प्रसिद्ध केला आहे. ई-फार्मसीच्या मसुद्याविरोधात निषेध नोंदविण्यासाठी २० ते २७ सप्टेंबर या काळात देशभरातील औषधविक्रेते काळ्या फिती लावून काम करत होते. त्यानंतर आता शुक्रवारी देशभरातील औषधांची दुकाने बंद असणार आहेत.

ऑनलाइन औषधविक्रीच्या मसुद्यामध्ये ई-फार्मसीला सरसकट अधिकार देण्यात आले असून याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. ई-फार्मसीमुळे औषधविक्रीमध्ये मक्तेदारी निर्माण होऊन औषधविक्रेते संपुष्टात येतील.

तेव्हा ई फार्मसीला सरकारने कायदेशीर मान्यता देऊ नये. या संपामध्ये देशभरातील तब्बल साडेआठ लाख औषध विक्रेते सहभागी होणार असून राज्यातील ७० हजारांहून अधिक दुकाने बंद असतील, असे ऑल इंडिया केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.