मद्याच्या नशेत एका तरुणीने पोलीस ठाण्यातच पोलिसांना शिव्या घातल्याची घटना उघडकीस आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी या तरुणीला अटक करून तिच्यावर दंडात्मक कारवाई केली.
शुक्रवारी रात्री अंधेरी पूर्वच्या एका हॉटेलमध्ये ही तरुणी मद्यपान करून आली होती. तिने प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान केले होते. त्यामुळे हॉटेल मालकाने तिला प्रवेश नाकाराला. त्या कारणावरून ती अधिकच भडकली आणि तिने त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. या प्रकरणाची माहिती हॉटेलच्या व्यवस्थापकाने एमआयडीसी पोलिसांना दिली. तिला एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र तिने पोलीस ठाण्यातच धिंगाणा घातला.
महिला पोलीस तिची समजूत काढत होते. तिच्या हातात बीअरची बाटली होती आणि पोलीस ठाण्यातच बीअर पीत ती पोलिसांना शिव्या घालत होती. ती स्वत:ला कधी पत्रकार तर कधी मॉडेल असल्याचे सांगत होती. एमआयडीसी पोलिसांनी तिच्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून १२०० रुपयांचा दंड आकारला. याशिवाय तिला न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीसही बजावण्यात आली आहे.
पोलिसांवर नामुष्की
तिला महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट ११२ प्रमाणे अटक करून न्यायालयात हजर केले आणि तेथे १२०० रुपयांचा दंड आकारून तिची सुटका केल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांडगे यांनी सांगितले. तिने पोलीस ठाण्यात घातलेल्या धिंगाण्याची चित्रफित सर्वत्र पसरल्याने पोलिसांवर नामुष्कीची वेळ ओढवली आहे.