मद्यधुंद अवस्थेतील पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर भीषण हल्ला केला. मंगळवारी मध्यरात्री वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या हल्ल्यातून पोलीस निरीक्षक जयेंद्र सावंत थोडक्यात बचावले आहेत. हल्लेखोर पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
मद्रासवाडी येथे मंगळवारी रात्री एक जण घरावर चढून धिंगाणा घालत असल्याची माहिती वरळी पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलीस नाईक सुभाष मिसाळ यांना तेथे पाठविण्यात आले. त्यापाठोपाठ वरळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयेंद्र सावंत हे देखील घटनास्थळी पोहोचले. मिसाळ हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सावंत यांच्या लक्षात आले. त्यामुळे सावंत यांनी आपल्यासोबत असलेल्या पोलिसांना मिसाळ यांची वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितले. यावरून मिसाळ आणि सावंत यांच्यात वाद झाला. त्याचवेळी सावंत बेसावध असताना मिसाळ याने जवळच पडलेल्या लाकडी दांडय़ाने सावंत यांच्या डोक्यावर वार केला. त्याचा फटका सावंत यांच्या कानाखाली बसला. तो प्रहार एवढा मोठा होता की सावंत खाली कोसळले आणि दहा मिनिटे बेशुद्धावस्थेत होते. त्यांना सुरवातीला पोतदार आणि नंतर जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. हा फटका डोक्यात बसला असता तर सावंत यांच्या जिवावर बेतू शकले असते. वरिष्ठांवर हल्ला करणाऱ्या मिसाळ याला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.