एका प्रवाशाने गोंधळ घातल्यामुळे गुरूवारी दुबईहून कोझीकोडेला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. आज सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी हे विमान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. गोंधळ घालणाऱ्या प्रवाशाला उतरवून विमानाने पुन्हा नियोजित स्थळासाठी उड्डाण केले. विमानतळ पोलिसांनी या प्रवाशाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रवाशाने विमानात आयसिसच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या. मात्र, विमानतळ प्रशासनाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. अद्यापपर्यंत या प्रवाशाची ओळख उघड करण्यात आलेली नाही. विमानातील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यानंतर सर्व प्रवाशांनी खाली उतरविण्यात आले. आज (गुरुवार) पहाटे दुबईहून या विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर काहीवेळातच या व्यक्तीने इसिस समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरवात केली. त्यामुळे विमानाचा मार्ग बदलून विमान मुंबईत उतरविण्यात आले.
अधिकृत माहितीनुसार, विमानाने उड्डाण केल्यापासूनच हा प्रवासी विमानातील कर्मचाऱ्यांना त्रास देत होता. तो आपल्या आसनावरून उठून खाद्यपदार्थ आणि अन्य उत्पादने ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कार्टवर जाऊन बसला. कर्मचाऱ्यांनी त्याला त्याच्या जागेवर जाऊन बसण्यास सांगितले. मात्र, काही केल्या हा प्रवासी एकत नव्हता. त्यानंतर तो अचानक आक्रमक झाला आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करू लागला. वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याबद्दल माहिती देऊन विमान मुंबई विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेतला.