आर्थिक घडी विस्कटल्या बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना निम्मा मार्च महिना संपला तरी फेब्रुवारीचे वेतन मिळालेले नाही. आणखी काही दिवस वेतन मिळण्याची शक्यता नसल्याने कर्मचाऱ्यांचा धीर सुटू लागला असून पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ कर्मचारी मंगळवारी वडाळा येथे निदर्शने करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

आर्थिक स्थिती बिकट बनल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन काही दिवस पुढे लांबवण्याची मागणी बेस्ट उपक्रमाने औद्योगिक न्यायालयाकडे केली होती. औद्योगिक न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागला आहे. निम्मा मार्च महिला संपला तरी अद्याप कर्मचाऱ्यांना  वेतन मिळालेले नाही. फेब्रुवारीचे वेतन ३० मार्च रोजी देण्यात येणार असल्याचे आणि त्यानंतर पुढील तीन महिने २० तारखेला वेतन देण्यात येणार असल्याचे समजल्यामुळे कर्मचारी प्रचंड संतापले आहेत. अद्याप  वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक परवड होऊ लागली आहे. कर्मचाऱ्यांना घरखर्चही चालविणे अवघड बनले आहे. त्यामुळे औद्योगिक न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार कर्मचारी संघटना करीत आहेत. मात्र तोपर्यंत न थांबता मंगळवारी वडाळा आगारात निदर्शने करण्याचा निर्णयही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.