पंधरा दिवसांत पाच कोटी रुपयांनी महसूल कमी

इंधन दरवाढ, कर्मचाऱ्यांचे वेतन इत्यादीमुळे एसटीवर आर्थिक भार पडत असतानाच आता दुष्काळामुळेही एसटीचे ‘दिवाळे’ निघण्याची शक्यता आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे ऐन दिवाळीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पाठ फिरवली असून त्याचा फटका एसटीला बसला आहे. एसटीला गेल्या १५ दिवसांत पाच कोटी रुपयांनी महसूल कमी मिळाले आहे. ऐन दिवाळीत एसटीवर आर्थिक परिस्थिती ओढवली असून पुढील सहा महिन्यांत हीच परिस्थिती राहिल्यास आणखी ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसुलावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने १ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबपर्यंत नऊ हजार ३२० जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. त्याशिवाय दिवाळीत गर्दीचा हंगाम असल्याने प्रवासी उत्पन्न मिळवण्यासाठी म्हणून १० टक्के भाडेवाढही लागू केली. परंतु यंदाच्या नोव्हेंबरमधील पहिल्या दोन आठवडय़ांमध्ये दिवाळीसारखा महत्त्वाचा सण असूनदेखील एसटी महामंडळाच्या प्रवासी भारमानमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये सरासरी सहा टक्क्यांनी घट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ५८ टक्के असलेले भारमान हे ५२ टक्के एवढे आहे. राज्यात काही भागांत पडलेल्या दुष्काळाचा एसटीला बसलेला फटका हे त्यामागील प्रमुख कारण आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये एसटीला सुमारे १५५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा जून २०१८ मध्ये १८ टक्के आणि त्यानंतर दिवाळीत हंगामी १० टक्के भाडेवाढ झाल्याने आतापर्यंत महसुलात ४४ कोटी रुपयांची वाढ होणे अपेक्षित होते. परंतु दिवाळीचा सण असूनदेखील केवळ ३८ कोटी रुपये एवढीच वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवडय़ांमध्ये एसटीला अपेक्षेप्रमाणे पाच कोटी रुपये कमी महसूल मिळाला आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश घोषित केले आहे. दुष्काळाचा परिणाम हा सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन अर्थ चक्रावर झालेला असून हे एसटीच्या घटलेल्या प्रवासी संख्येवरून स्पष्ट होते. दुष्काळामुळे खिशालाही बसू लागलेली झळ, उत्पन्नासाठी स्थानिकांनी काही दिवसांसाठी अन्यत्र केलेले स्थलांतर आणि एसटीतून कमी झालेली मालवाहतूक इत्यादी कारणांमुळे उत्पन्न कमी झाल्याचे सांगण्यात आले.

एसटीला दुष्काळाची झळ विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात बसली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये आठ ते नऊ टक्क्यांनी प्रवासी संख्येत घट झाली आहे. विशेषत: नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्य़ांमध्ये एसटीची प्रवासी संख्या खूपच कमी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात एकटय़ा अमरावतीतील एसटी प्रवासी भारमान पंधरा टक्क्यांहून कमी झाल्याचे सांगण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व कोल्हापूर यांसारख्या जिल्ह्य़ांमध्येसुद्धा भारमानामध्ये दहा टक्क्यांची घट आहे. दुष्काळाची झळ मराठवाडय़ात कमी असून येथील बहुतेक जिल्ह्य़ातील एसटीच्या भारमान दहा टक्क्यांनी कमी झाले आहे. परिणामी एसटीचे राज्यातील एकूण भारमान हे सरासरी सहा टक्क्यांहून कमी झाले.

सवलतीचाही आर्थिक भार

शासनाने दुष्काळसदृश म्हणून नुकत्याच जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षांसाठी मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय नुकताच एसटी महामंडळाने घेतला. शालेय, महाविद्यालयीन व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पाससाठी सध्या ६६.६७ टक्के सवलत देण्यात येते. शैक्षणिक वर्षांसाठी ही सवलत १०० टक्के देण्यात येणार असल्याने एसटी महामंडळावर ८५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. दुष्काळामुळे बुडणाऱ्या महसुलात हीदेखील भर पडणार असल्याने एसटीची आर्थिक स्थिती चांगलीच ढासळणार आहे.

एसटीला फायदा नाहीच

गेल्या पंधरा दिवसांत एसटी महामंडळाचे गतवर्षीच्या तुलनेत ३८ कोटी रुपयांनी महसूल वाढल्याचे जरी दिसत असले तरी ही वाढ गतवर्षीच्या तुलनेत २८ टक्के भाडेवाढ झाल्यामुळे आहे. त्यामुळे एसटीचे भाडे वाढूनही अपेक्षित प्रमाणात भारमानात वाढ न झाल्याने भाडेवाढीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा एसटी महामंडळाला मिळालेला नाही.