लशीचा साठा संपल्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुल केंद्रातील लसीकरण बुधवारी स्थगित ठेवले आहे. पालिकेला १. २५ लाख लशींच्या मात्रा मिळाल्या असून सर्व केंद्र कार्यान्वित होत आहेत, असे पालिकेने नुकतेच जाहीर केले होते. यानंतर दोनच दिवसांत बीकेसी लसीकरण केंद्रातील साठा संपला आहे. त्यामुळे बुधवारी केंद्रात लसीकरण होणार नाही.

‘आम्हाला दोन दिवसांपूर्वी १२ हजार मात्रा मिळाल्या होत्या. दिवसाला जवळपास साडे पाच ते सहा हजार जणांचे लसीकरण केंद्रावर केले जाते. त्यामुळे हा साठा दोनच दिवसांत संपला आहे. त्यामुळे पुढील साठा मिळेपर्यत लसीकरण स्थगित करावे लागले आहे’, असे बीकेसी केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले.

‘पालिकेने कालच ८० हजार मात्रा सर्व लसीकरण केंद्राना पुरविल्या असून सध्या साठा शिल्लक नाही. त्यामुळे एखाद्या लसीकरण केंद्रावरील साठा संपल्यास आता पुढील साठा येईपर्यत वाट पाहावी लागेल. बुधवारी काही साठा येण्याची शक्यता आहे’, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.