घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३व्या महापरिनिर्वाण दिनी (६ डिसेंबर) त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीमानुयायी मुंबईत दाखल होतात. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी उद्या वाहतुकीच्या काही मार्गांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनाकडून करण्यात आले आहे.

महापरिनिर्वाण दिनी दादर येथील चैत्यभूमीपरिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे बुधवार, ५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून ते शनिवार, ७ डिसेंबर रोजी संध्या ५ वाजेपर्यंत येथील काही प्रमुख मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

‘वन वे’ आणि बंद असलेले मार्ग –

  • एस. के. बोले रोड हा सिद्धिवनायक जंक्शन ते हनुमान मंदिरापर्यंत ‘वन वे’ असणार आहे. त्यामुळे हनुमान मंदिरापासून या मार्गावर ‘नो एन्ट्री’ असेल.
  • भवानी शंकर रोड हनुमान मंदिरापासून (दादर कबुतर खाना) ते गोखले रोड साऊथपर्यंत ‘वन वे’ असेल. म्हणजेच गोखले रोड साऊथ व्हावा गोपिनाथ चव्हाण चौक येथून या मार्गावर ‘नो एन्ट्री’ असणार आहे. (यामध्ये बेस्ट बसेस आणि अत्यावश्यक सेवां देणाऱ्या वाहनांना परवानगी असेल)
  • सिद्धिविनायक जंक्शनपासून हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत एसव्हीएस रोड बंद असेल.
  • रानडे रोडही बंद ठेवण्यात येणार आहे.
  • ज्ञानेश्वर रोड हा एसव्हीएस जंक्शन पासून दादर चौपाटीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
  • सर्व प्रकारची अवजड वाहने, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीचा मार्ग (बस वगळून) माहिम जंक्शन व्हावा मोरी रोड ते सेनापती बापट मार्गपर्यंत वळवण्यात येणार आहे.
  • दरम्यान, पश्चिम रेल्वे उद्या १२ विशेष लोकल गाड्या सोडणार आहे. या लोकल गाड्या ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच धावतील. त्याचबरोबर राज्यात लांब पल्ल्याच्या १४ विशेष रेल्वे गाड्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. लांब पल्ल्याच्या या विशेष गाड्या नागपूर, अजनी, सोलापूर, गुलबर्गा आणि इतर ठिकाणांवरुन सोडण्यात येणार आहेत.