राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या सिंचन प्रकल्प, रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो सारख्या पायाभूत सुविधांच्या कामावरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. मात्र राज्यात या कामांना आठवडाभरापूर्वीच परवानगी देऊनही कामगारांच्या टंचाईमुळे ही कामेच सुरू होऊ शकलेली नाहीत.

सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागाने  ग्रामीण भागातील रस्ते आणि सिंचन प्रकल्पांची कामे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी  या प्रकल्पांवर काम करणारे कामगार परराज्यातील असल्याने सरकार समोर नवे संकट उभे ठाकले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव  सुरू होताच राज्यात २४ मार्चपासून टाळेबंदी सुरू करण्यात आली असून आता ती ३ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. केंद्र सरकारने टाळेबंदी  लागू करण्यापूर्वीच राज्यातील विकास कामे बंद करण्यात आली होती. याचा सर्वाधिक फटका पायाभूत सुविधा प्रकल्पांना बसू लागला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग  यासह राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्गाची हजारो कोटी रूपये खर्चाची कामे तसेच सिंचन प्रकल्पाची कामेही गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. जलसंपदा  तसेच सार्वजनिक विभागाची कामे अत्यंत महत्वाची असल्याने ती अधिक काळ बंद राहिल्यास प्रकल्पांच्या किंमतीत होणारी वाढ आणि राज्याला मिळणाऱ्या सुविधा असा दुहेरी फटका बसत होता. त्यामुळे शहर,खेडय़ापासून दूर म्हणजेच लोकवस्तीपासून दूर असणाऱ्या पायाभूत  सुविधा प्रकल्पांची कामे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला.

विशेष म्हणजे ही कामे करताना नियमांचा भंग झाला किं वा तेथील कोणाला करोनाची लागण झाली तर त्याची जबाबदारी ठेकेदारावर  टाकण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने ही परवानगी सिंचन प्रकल्पांसाठी दिली असून याच धर्तीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या त्या भागातील रस्ते,पूल प्रकल्पांसाठी परवानग्या दिल्या होत्या. मात्र टाळेबंदीमुळे बहुतांश कामगार आपापल्या गावी निघून गेल्याने ही काम सुरू  करण्यात अडचणी येत असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

मुंबई- गोवा आणि समृद्धी महामार्गाची कामे सुरू करण्यात आली आहेत. या प्रकल्पांवर काम करणारे कामगार हे प्रामुख्याने कर्नाटक, तेलंगना,आंध्रप्रदेशातील असतात. टाळेबंदी होताच ठेके दारांनी कामागारांची जबाबदारी नको म्हणून त्यांना आपापल्या गावी पाठविल्याने अनेक ठिकाणी कामगारच नसल्याचे आढळून येत आहे. मात्र यंत्राच्या साह्य़ाने शक्य असतील ती कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून  टाळेबंदी उठून कामगार परत आल्यावर, म्हणजेच मे च्या दुसऱ्या आठवडय़ापासू रस्त्यांची कामे सुरू होतील असेही या अधिकाऱ्याने सांगितले.