पालिका सभागृहाच्या शिफारशीनुसार प्रशासनाने समस्त नगरसेवकांना सभाशास्त्र, पालिकेचे कामकाज, पालिका अधिनियम आदींविषयी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय स्थानीय स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यामुळे नगरसेवकांच्या प्रशिक्षणाचा मुहूर्त हुकला असून आता हे प्रशिक्षण लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये पार पडली. विजयी झालेल्या नगरसेवकांमध्ये पालिकेच्या कामकाजाबाबत अनभिज्ञ असलेल्यांची संख्या अधिक आहे. पालिका सभागृहाचे कामकाज कसे चालते, एखादा विषय कोणत्या नियमानुसार सभागृहात उपस्थित करायचा, पालिकेचा कारभार कसा चालतो, पालिका अधिनियम १८८८ मधील तरतुदी आदींबाबत बहुतेक नगरसेवक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे निवडणुकीत विजयी होऊन पालिकेत दाखल झालेल्या नगरसेवकांना सभाशास्त्र आणि अन्य बाबींबाबत मार्गदर्शन करावे, अशी ठरावाची सूचना समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी पालिका सभागृहात मांडली होती. सभागृहाने एकमताने पाठिंबा दिल्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या ठरावाच्या सूचनेला मंजुरी दिली.

नगरसेवकांना मार्गदर्शन करण्याबाबत मंजूर केलेली ठरावाची सूचना पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली होती. प्रशासन पातळीवर या ठरावाच्या सूचनेचा सकारात्मक विचार करण्यात आला. पालिका चिटणीस विभागाच्या माध्यमातून नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यात यावे, असा एक मतप्रवाह पालिकेत होता. मात्र अखेर अखिल भारतीय स्थानीय स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून नगरसेवकांना पालिका अधिनियम १८८८ मधील तरतुदी, पालिकेचे प्रत्यक्ष कामकाज, पालिकेचा अर्थसंकल्पातील तरतुदी आणि त्याचा विनिमय, प्रकल्प, नागरी कामे आदींविषयी नगरसेवकांना मार्गदर्शनपर प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रशिक्षणाची तयारी चिटणीस विभागाने सुरू केली आहे. प्रशिक्षणाच्या आयोजनाची प्रक्रिया सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे.