01 October 2020

News Flash

टाळेबंदीने कापड उद्योगाची वीण उसवली..

ग्राहकांची पाठ, नियमांचे बंधन आणि मर्यादित वाहतुकीमुळे व्यवसाय १५ टक्क्यांवर

संग्रहित छायाचित्र

संसर्गाची भीती, मर्यादित वेळेत, ठरावीक दिवशीच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी, अपुरी वाहतूक व्यवस्था आदींमुळे कापड उद्योगाची वीण उसवली आहे. तयार कपडे विक्रेते आणि शिवणकाम व्यावसायिकांच्या ग्राहकांची संख्याही घसरली असून दुकान भाडे, वीज, कामगारांचे वेतन व इतर खर्च भागवताना त्यांना कसरत करावी लागत आहे.

टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर कपडे विक्रेत्यांची दुकाने सुरू झाली. मात्र, ग्राहकांमध्ये करोनाची भीती अद्यापही दिसून येत आहे. लग्नसराईचा काळ टाळेबंदीत गेल्याने अनेकांकडे त्यापूर्वी भरलेला माल अद्याप पडून आहे. नजीकच्या सणासुदीच्या काळात किंवा दिवाळीत त्यास उठाव मिळेल का, अशी चिंता अनेकांना भेडसावत आहे. समारंभावर असलेल्या बंधनांमुळे दिवाळीनंतरची लग्नसराई कितपत साथ देईल, याबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली. व्यवसाय सावरण्यास मार्च २०२१ उजाडेल, अशी शक्यता व्यावसायिक व्यक्त करतात.

‘दिवाळीत थोडाफार व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे. मात्र, सध्या दुकान सुरू ठेवण्याचा खर्चच कसाबसा पूर्ण करावा लागत आहे. त्यामुळे अतिसंक्रमित भाग वगळता अन्यत्र सम-विषमचा नियम न लावता सर्व दिवस दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी,’ अशी मागणी मुंबई (लालबाग) येथील महावीर कलेक्शनचे राकेश जैन यांनी केली. शासनाने या व्यवसायास आर्थिक मदत करावी, असेही ते म्हणाले.

‘वाहतुकीची साधने मर्यादित असल्याने ग्राहक दुकानापर्यंत पोहोचू शकत नाहीत. दिवसभरात केवळ एक किंवा दोनच साडय़ा विकल्या जात असल्याचे दादर येथील सखी सहेली दुकानाचे मयांक सचदेव यांनी सांगितले. मॉलमध्ये सर्व सुरक्षा नियम पाळण्याची सुविधा निर्माण करता येते. त्यामुळे तेथे ग्राहक येऊ शकतील. म्हणून सर्व नियमांसह मॉल सुरू करण्याची परवानगी शासनाने द्यावी, अशी मागणी देशपातळीवरील कपडे उत्पादक संघटनेचे राजीव मेहता यांनी केली.

ठाणे शहरातील टाळेबंदी सोमवारपासून शिथिल झाली असली तरी सम-विषम नियम आणि सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहक दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत येत असतात, अशी माहिती शुभकन्या सारीजचे रमणिक बौवा यांनी दिली. परिणामी उत्पन्न घटल्यामुळे दुकानाचे भाडे आणि कामगारांचे वेतन देणेही अडचणीचे ठरत असल्याचे बौवा यांनी सांगितले. ग्राहकांच्या मनातून करोनाची भीती अद्याप गेली नसल्यामुळे ग्राहक खरेदीसाठी अजूनही बाहेर पडत नसल्याने कपडय़ांची विक्री ८५ ते ९० टक्क्यांनी मंदावली असल्याची माहिती कॉटन किंगचे वृषभ डागळे यांनी दिली.

कपडे शिलाईच्या व्यवसायात यापेक्षा वेगळे चित्र नाही. ‘लग्नसराईत व्यवसायाला गती मिळते. तो हंगाम टाळेबंदीत गेला. ग्राहकांच्या प्राधान्यक्रमात कपडे खरेदी, शिलाई दुय्यम स्थानी आहे’ असे नाशिक येथील डी. एस. टेलर्सचे संचालक दिलीप सोनवणे यांनी सांगितले. काहींनी नाइलाजास्तव कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबले. सरकारने उद्योगांना दिलासा देण्यासाठी अनेक योजना आखल्या. यात शिवणकाम व्यावसायिकांचा विचार झाला नाही, अशी भावना या क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

ठाण्यातील अनेक भागांमध्ये टाळेबंदी शिथिल झाली असली तरी करोनाच्या भीतीमुळे शिवणकाम व्यावसायिकांकडे दिवसाला एक ते दोन ग्राहकच कपडे शिवण्यासाठी येत आहेत. त्यामुळे दिवसाच्या उत्पन्नापेक्षा कारागिरांचे वेतन आणि दुकानाचे भाडे याचा खर्चच अधिक असल्याची माहिती ठाण्यातील एस. ए. इनामदार आणि कंपनीच्या श्वेता इनामदार यांनी दिली. उत्पन्नाअभावी दादर येथील दुकान बंद करण्याची वेळ ओढवली असून या दुकानातील १५ कारागिरांना घरी बसवण्याची वेळ आल्याचेही श्वेता यांनी सांगितले.

‘जवळून संपर्क येत असल्याने ग्राहक माप देण्यास येण्याची शक्यता सध्या कमी आहे. आम्ही साधनांचे किती वेळा निर्जंतुकीकरण करणार, यावरही मर्यादा आहेत. अजून तरी वापरा आणि फेकून द्या अशा माप घेण्याच्या टेप आल्या नाहीत,’ असे वांद्रे येथील शिवणकाम व्यावसायिक शबनम सिद्दिकी यांनी सांगितले.

तयार कपडे विक्रेत्यांकडे याआधीचा माल पडून आहे. त्यामुळे नवीन मागणी सध्या नाही. परिणामी अशा विविध दुकानांना तयार कपडे, अंतर्वस्त्रे पुरविणारे सुमारे १० हजार शिवणकाम व्यावसायिक मुंबई आणि महानगर परिसरात आहेत. एखाद्या गाळ्यात अथवा औद्योगिक इमारतीत वीसतीस व्यावसायिकांची सोय असते. त्यांचा व्यवसाय सध्या पूर्णत: ठप्प आहे. यामध्ये बहुतांश कामगार हे स्थलांतरित असून त्यांनी मे महिन्यात गाव गाठले असून मुंबईत काम नसल्याने त्यांना तिकडेच रोजगार शोधावा लागत असल्याचे शिवणकाम व्यावसायिकांचे कंत्राटदार संतोष रामहरी पंडा यांनी सांगितले.

मालेगावातील कापड उद्योगाला मोठा फटका

मालास उठाव नसणे, त्यातच व्यवसायातील वितरण साखळी विस्कळीत यामुळे मालेगाव येथील यंत्रमाग व्यवसाय निर्बंध शिथिल होऊनही अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. ३० टक्के यंत्रमाग बंद आहेत. मालेगावात जवळपास तीन लाख यंत्रमाग असून २० हजार कारखाने आहेत. शहराची आर्थिक भिस्त याच व्यवसायावर आहे. सुरत, अहमदाबादचे कापड बाजार बंद असल्याने मालेगावच्या कापडाची विक्री थांबली आहे. वडोदरा येथे काही प्रमाणात माल जातो. मराठवाडा, विदर्भातील बाजारपेठा बंद असल्याची झळ यंत्रमागधारकांना बसत आहे. कपडय़ावर प्रक्रिया करणाऱ्या अनेक उद्योगांवर आर्थिक अरिष्ट कोसळले. टाळेबंदीआधी विकलेल्या मालाचे पैसे अडकले आहेत. केंद्र सरकारने लघू, मध्यम उद्योगांना अनेक सवलती देण्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र यंत्रमाग कारखानदारांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे मालेगाव पॉवरलूम विणकर संघटनेचे सचिव शब्बीर डेगवाले यांनी सांगितले. पुढील काळात मालेगावसारखे एकच केंद्र सुरू राहिले तर कापड व्यवसाय रुळावर येणार नाही. कापड विक्री प्रक्रियेतील साखळी विस्कळीत झाल्याचे व्यावसायिक सांगतात.

अडचणी काय?

* करोना संसर्गाच्या भीतीमुळे ग्राहकांची पाठ

* दुकाने सुरु ठेवण्याच्या मर्यादित वेळा, सम-विषमच्या नियमांमुळे विक्रीवर परिणाम.

* वाहतुकीची साधने मर्यादीत असल्यामुळे बाजारातील ग्राहक कमी.

मागण्या काय?

* दुकानांचे भाडे माफ करा

* शासकीय योजनेत कपडे विक्रेते, शिवणकाम व्यावसायिकांचा समावेश करावा

* वस्तू आणि सेवा कर भरण्यासाठीची मुदत वाढवून द्यावी. टाळेबंदीच्या काळातील कर माफ करावा.

* दुकाने पूर्णवेळ आणि सर्व दिवस उघडी ठेवण्याची परवागनी द्यावी

खर्चाचे गणित अवघड

ग्राहक कमी, पण सर्व खर्च सुरु, अशी परिस्थिती असल्याने सर्वच कपडे विक्रेते आणि शिवणकाम व्यावसायिक अडचणीत आहेत. नजीकच्या काळात मालास मोठा उठाव मिळण्याची शक्यता नसून सध्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत. अशावेळी भाडय़ामध्ये दिलासा मिळावा, शासकीय योजनेतून मदत करावी, अशी मागणी होत आहे.

कापड उद्योगाला सरकारचे प्राधान्य नसले तरी या उद्योगातून खूप मोठा रोजगार निर्माण होतो ही बाब महत्त्वाची आहे. तयार कपडे विक्रेत्यांशी जोडलेली छोटय़ामोठय़ा स्वरूपातील शिवणकाम करणारी १८ हजार उद्योग केंद्रे राज्यात आहेत. त्यांचा व्यवसायदेखील बंद आहे. या सर्वाचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाने योजना आखाव्यात.

– राजीव मेहता, क्लोदिंग मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया, प्रमुख मार्गदर्शक

(संकलन : अनिकेत साठे, सुहास जोशी, आशिष धनगर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 12:20 am

Web Title: due to the lockdown restrictions on the textile industry rules and limited transportation the business has increased by 15 per cent abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 निर्बंध शिथिल.. पण नागरिक सावध!
2 हॉटेलांमधील अलगीकरण आता किफायतशीर
3 टाळेबंदीत ३२ हजार रुग्णांची वाढ
Just Now!
X