राज्यात लॉकडाऊन होण्याआधी दहा दिवस आधी तो तरुण अमेरिकेहून परतला. ‘करोना‘चा संसर्ग वाढू लागल्याने परदेशातून आलेल्या प्रत्येकाची तपासणी होत होती. त्यालाही सामोरे जावे लागले. काहीही लक्षणे नसतानाही त्याला १४ दिवस विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले. हा काळ त्याने घरात स्वतंत्र खोलीत व्यतीत केला. या काळात कुठलीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे संबंधित यंत्रणेलाही त्याने कळविले. ते म्हणाले की, आता तुम्ही दैनंदिन जीवनात वावरू शकता. त्यामुळे तो घराबाहेर पडला आणि सोसायटीने त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. तो हैराण झाला. दहिसर पूर्वेतील एका सोसायटीतील ही घटना असली तरी   परदेशातून आलेल्या अनेकांना याचा अनुभव येत आहे. सोसायटीतील काही मंडळींनी या तरुणाच्या कंपाऊंडमधील उपस्थितीला आक्षेप घेतला. यापैकी काहीजण त्याला पुन्हा चाचणी करण्याचा आग्रह धरू लागले. त्यामुळे त्याने शासनाने दिलेल्या होल्पलाईनवर फोन करून सर्व तपशील सांगितला. तेव्हा तुम्हाला पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असे त्याला सांगण्यात आले. तसे त्याने सोसायटीच्या संबंधित सदस्यांना सांगितले. परंतु ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी चाचणीचा आग्रह धरला. तो तयार झाला. त्यामुळे त्याने खासगी लॅबमध्ये फोन केला. परंतु डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय आम्ही चाचणी करू शकत नाही, असे त्याला सांगण्यात आले.  त्यामुळे तो खासगी डॉक्टरांकडे गेला. काहीही लक्षणे नसल्यामुळे डॉक्टरांनीही चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शन देण्यास नकार दिला. त्याची पंचाईत झाली. प्रिस्क्रिप्शनसाठी तो घराबाहेर पडला तेव्हा त्याचे छायाचित्र काढून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. करोना संशयित फिरत असल्याची ही तक्रार असल्यामुळे पोलीसही तात्काळ आले. त्याआधीच सदर तरुणाने आपली कैफियत लघुसंदेशाद्वारे पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत आणि परिमंडळ १२ चे उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांना पाठविली. त्यांना या प्रकरणातील गांभीर्य लगेचच लक्षात आले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याना सोसायटीमध्ये पाठविण्यात आले. त्याने सदस्यांकडून समजूत काढली. अखेरीस यापैकी एक सदस्यच त्या तरुणासोबत चाचणीसाठी गेला. तेव्हापासून हा तरुण आणि त्याचे कुटुंबीय कुणाच्याही संशयास्पद नजरांना तोंड न देता सोसायटीत वावरू लागले आहेत.