22 April 2019

News Flash

बांधकामांमुळे बोरिवलीत धूळधाण

बांधकाम करताना आवश्यक काळजी न घेतल्याने बोरिवलीत रहिवाशांना तोंड दाबून धुळीचा मारा सहन करावा लागत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नमिता धुरी

वाहतुकीमुळेही प्रदूषणात भर; संबंधित अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी

वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात इमारतींची, रस्त्यांची बांधकामे आणि मुख्य म्हणजे मेट्रोच्या कामाची भर पडल्याने बोरिवली पूर्व येथील राजेंद्रनगर, देवीपाडा परिसरातील नागरिकांना गेले अनेक महिने धूळ आणि प्रदूषित हवेमुळे आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बांधकाम करताना आवश्यक काळजी न घेतल्याने बोरिवलीत रहिवाशांना तोंड दाबून धुळीचा मारा सहन करावा लागत आहे.

राजेंद्रनगर भागात अनेक मोठे निवासी बांधकाम प्रकल्प राबविले जात आहेत. बांधकाम करताना विकासकाने संपूर्ण प्रकल्पाला कम्पाऊंड करणे, इमारतीला जाळ्या लावणे, रस्त्यावर पाणी मारणे अपेक्षित असते. मात्र तसे होत नसल्यामुळे वातावरणात धूळ पसरल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यात गेली दीड-दोन वर्षे येथे मेट्रोचे काम सुरू आहे. या कामामुळे या परिसरात सतत धुळीचे साम्राज्य असते. रस्त्यावरच नव्हे तर इथल्या झाडांच्या पानांवर, बसथांब्यांवर, वाहनांवर कायम धुळीचे थर जमलेले असतात. त्यात वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाची भर पडते आहे. या प्रदूषणाचा परिणाम येथील रहिवाशांच्या आरोग्यावरही होत आहे. येथील जागरूक रहिवाशांनी संबंधित यंत्रणांकडे या बाबत तक्रारीही केल्या. पालिका, एमएमआरडीए, पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ असे सगळेच एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

येथील रहिवासी व मनसेचे पदाधिकारी कुणाल माईणकर यांनी आतापर्यंत पालिकेच्या आर मध्य विभागाचे साहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दहिसर पूर्व परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. याबाबत रमाकांत बिरादर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, इमारतींच्या बांधकामांमुळे होणारे प्रदूषण रोखण्याची जबाबदारी पालिकेच्या मुख्य कार्यकारी अभियंता, बांधकाम प्रस्ताव यांची असल्याचे सांगितले. त्यावर पालिकेच्या उप-मुख्य अभियंता, बांधकाम प्रस्ताव पराग राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, ‘आम्ही फक्त बांधकामांना परवानगी देतो. प्रदूषण रोखण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची असते,’ असे त्यांनी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी डी. पी. कोपरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बांधकामामुळे प्रदूषण होत नसल्याचा दावा केला. मात्र, बांधकाम करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व नियम विकासक पाळत असून या भागातील प्रदूषणाचे मुख्य कारण वाहतूक असल्याचे त्यांनी सांगितले.

मेट्रोच्या बांधकामामुळेही देवीपाडा परिसर प्रचंड प्रदूषित होत आहे. रस्ताभर पसरलेली माती वाहनांच्या वेगामुळे हवेत उडते. त्यामुळे रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या रहिवाशांना डोळे उघडे ठेवून चालणेही कठीण होते. सुरक्षेसाठी असणारे पोलीस आणि वाहतूक पोलिसांनाही काहीवेळा तोंडाला रुमाल बांधून बसावे लागते. याबाबत एमएमआरडीएचे जनसंपर्क अधिकारी के. मूर्ती यांनी बोलण्यास नकार दिला.

‘अतिशय वाईट’

गेल्या आठवडय़ाभरापासून बोरिवलीचा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ ३०० ते ४०० च्या दरम्यान म्हणजेच ‘अतिशय वाईट’ दर्जाची हवा दर्शवणारा असल्याची नोंद ‘सफर’ या प्रदूषण मापक यंत्रणेने केली आहे.

झाडांवरही परिणाम

येथील एका मोठय़ा निवासी बांधकाम प्रकल्पापासून काही अंतरावरच आणखी दोन इमारतींचेही बांधकाम सुरू आहे. वातावरणातील धुळीमुळे श्वसनाचे विकार, दमा, डोळे चुरचरणे, घशाला संसर्ग अशा प्रकारचे आजार होत असल्याचे येथील रहिवासी सांगतात. येथे एका दुचाकीच्या शोरूममधील नव्याकोऱ्या गाडय़ा तसेच बसस्टॉप धुळीने माखले आहेत. झाडांचेही आरोग्य धुळीमुळे धोक्यात आले आहे. ‘झाडांच्या पानांवर धूळ बसल्याने त्यांची प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. परिणामी झाडांची वाढ खुंटते. दिल्लीत प्रदूषण वाढल्यास तेथील झाडांवर पाण्याचे फवारे मारले जातात. पण आपल्याकडे अशी काळजी घेतली जात नाही’, अशी खंत ‘वनशक्ती’चे स्टॅलिन यांनी व्यक्त केली.

First Published on January 24, 2019 2:12 am

Web Title: due to traffic there is also a lot of pollution in borivali