मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाची ऐशीतैशी

पारसिक बोगद्यातील वेगमर्यादा, ओव्हरहेड वायरपासून सिग्नल यंत्रणेपर्यंत विविध यंत्रणांमध्ये होणारे तांत्रिक बिघाड आणि रेल्वेमार्गावरील अपघात यांमुळे गेल्या दोन महिन्यांत मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत मिळून मध्य रेल्वेवरील तब्बल १० हजार सेवा दिरंगाईने धावल्या आहेत. या दोन महिन्यांत धावलेल्या एकूण फेऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ १० टक्के एवढेच असले तरी त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे मुंबई दौऱ्यावर आलेल्या रेल्वे बोर्डाच्या सदस्यांनीही याची दखल घेत वक्तशीरपणा सुधारण्यावर भर देण्याचे आश्वासन दिले आहे.

मध्य रेल्वेच्या सेवा गेल्या दोन महिन्यांत प्रचंड उशिराने धावत असल्याने मध्य रेल्वेचे प्रवासी हैराण झाले आहेत. सिग्नल यंत्रणेत बिघाड होणे, पेण्टोग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकणे, रुळाला तडा जाणे आदी नेहमीच्या कारणांमुळे सेवा दिरंगाईने धावतात, तर कधी दिवा, ठाकुर्ली, चुनाभट्टी येथील रेल्वे फाटकांमुळे वक्तशीरपणाचा बोजवारा उडतो. यंदाच्या मे महिन्यात हार्बर आणि मुख्य मार्गावर मिळून वक्तशीरपणा ८८ टक्के होता. मागील वर्षी याच काळात हे प्रमाण ९० टक्के एवढे होते. म्हणजेच या कालावधीत रेल्वे वाहतुकीतील दिरंगाई दोन टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या महिनाभरात ४ हजार ९६० फेऱ्या दिरंगाईने चालल्या. म्हणजेच दिवसाला १६० हून अधिक फेऱ्यांच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाला. एप्रिल महिन्यात ही संख्या पाच हजारांपेक्षा जास्त होती, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.या दोन्ही मार्गावर मिळून दिवसभरात १६६० सेवा चालवल्या जातात. त्यांपैकी १५० ते १८० सेवांच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडत असेल, तर दर दिवशी १० ते १२ टक्के सेवा दिरंगाईने धावत आहेत. हा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी आता थेट रेल्वे बोर्डाकडूनच आदेश आल्याने हालचाली होतील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.