राज्यातील महाविकास आघाडी सरकार  करोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना  भाजपचे मंत्री, नेते राज्याला मदत करण्याची भूमिका घेण्याऐवजी राज्यावर अपयशाचा शिक्का मारुन मोकळे होत आहेत, त्यातून त्यांचे दुटप्पी राजकारण उघड होत आहे, अशी टीका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी करोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्राकडून राज्याला भरघोस मदत मिळवून द्यायला हवी होती. राज्य संकटात असताना जावेडकर मात्र मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत, हे ढोंगी राजकारण असल्याचा समाचार  प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी घेतला. केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात करोनाची परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते  अनंत गाडगीळ यांनी केला. तर लशींचा खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लस महोत्सव साजरा करायला सांगतात, हे अजब आहे, अशी टीका प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते  महेश तपासे यांनी केली. प्रकाश जावडेकर हे पुण्याचे रहिवासी आहेत, किमान त्यांनी पुण्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी केंद्राकडे आपले वजन वापरायले हवे होते.  हे न करता  मुख्यमंत्र्यांचा राजनामी मागणून आपल्या दुटप्पी राजकारणे त्यांनी दर्शन घडविले आहे, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

नको तिथे आत्मनिर्भयपणा

महाराष्ट्राला  अधिक  लस  पुरवून  सर्वात  बाधीत  जिह्यांमध्ये  सर्वांना  लसीकरण  करण्याची  केंद्राने  परवानगी  देणे  समयोचित  ठरले  असते, असे अनंत गाडगीळ यांनी म्हटले आहे.  भारत बायो  व  सिरम  या   दोन्ही  कंपन्यांची मिळून  वर्षाला  केवळ  २.५  कोटी  लस निर्माण करण्याची  क्षमता  आहे.  या  गतीने  १२५ कोटी भारतीयांना  लस  मिळण्यास  कित्येक  वर्षे  थांबावे लागेल. त्याउलट,  परदेशात  प्रभावी  ठरलेल्या  लस कंपन्यांना भारतात  परवानगी  नाकारून  नको,  तिथे आत्मनिर्भयपणा  केंद्र  सरकार  दाखवत  आहे, अशी टीकाही त्यांनी केली.