मुंबईमधील करोना रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल सरासरी २२९ दिवसांवर पोहोचला असून करोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. सोमवारी दिवसभरात मुंबईत करोनाचे नवे ५९९ रुग्ण नोंदले गेले, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी  दिवाळीच्या खरेदीनिमित्त बाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी सरकार आणि महापालिकेसाठी चिंतेची बाब ठरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्याचबरोबर मृत्यूचा दरही नियंत्रणात येत असल्याचे पालिकेकडून उपलब्ध होणाऱ्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आतापर्यंत मुंबईतील करोनाबाधितांची संख्या दोन लाख ६५ हजार १४२ च्या घरात पोहोचली आहे. सोमवारी मृत्युमुखी पडलेल्या २० रुग्णांमध्ये १५ पुरुष तर पाच महिलांचा समावेश होता. आतापर्यंत १० हजार ४६२ रुग्णांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी १९ जणांना दीर्घकालीन आजार होते. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले ५०७ रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत मुंबईतील दोन लाख ३७ हजार ०२९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये १६ हजार ९२३ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईतील करोनावाढीचा दर ०.३० टक्क्य़ांवर पोहोचला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्य़ांवर पोहोचले आहे.