05 December 2020

News Flash

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर

२० ऑक्टोबर रोजी १०० दिवसांचा टप्पा ओलांडला होता.

(संग्रहित छायाचित्र)

 

मुंबईमधील करोनाबाधित रुग्ण दुपटीच्या कालावधीत अवघ्या १० दिवसांमध्ये ५७ दिवसांनी वाढ झाली असून आजघडीला रुग्ण दुप्पटीचा काळ सरासरी १०० दिवसांवरून १५७ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीच्या कालावधीने २० ऑक्टोबर रोजी १०० दिवसांचा टप्पा ओलांडला होता.

गणेशोत्सवादरम्यान बाजारपेठांमध्ये झालेल्या गर्दीमुळे रुग्णसंख्येत वाढ झाली होती. मात्र बाधित आणि संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना अलगीकरण, विलगीकरणात ठेवल्यानंतर संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण येऊ लागले आहे. रुग्णसंख्या कमी होऊ लागताच रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढू लागला आहे. दहा दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने सरासरी शंभर दिवसांचा टप्पा गाठला होता. आता त्यात ५७ दिवसांची वाढ झाली असून हा कालावधी सरासरी १५७ दिवस झाला आहे.

विशेष म्हणजे परळ परिसर (एफ-दक्षिण विभाग) रुग्ण दुप्पटीचा कालावधीचा २०० दिवसांचा टप्पा ओलांडणारा पहिला विभाग ठरला होता. आजघडीला या भागातील रुग्ण दुप्पटीचा कालावधी ३६२ दिवसांवर पोहोचला आहे. यापाठोपाठ सॅण्डहर्स्ट रोड (बी), एल्फिन्स्टन (जी-दक्षिण), कुलाबा (ए) या विभागांनीही रुग्ण दुप्पटीत २०० दिवसांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या या विभागांमध्ये रुग्ण दुप्पटीचा काळ अनुक्रमे २३२, २३१ व २१२ दिवस असा आहे.

दादर (जी-उत्तर), भायखळा (ई), भांडूप (एस), चेंबूर (पूर्व) (एम-पूर्व) या भागातील रुग्ण दुप्पटीचा काळ १७६ ते १९९ दिवसांच्या दरम्यान आहे. अंधेरी पूर्व (के-पूर्व), माटुंगा (एफ-उत्तर), दहिसर (आर-उत्तर), मुलुंड (टी), घाटकोपर (एन), ग्रॅन्टरोड (डी), खार (एच-पूर्व) भागातील रुग्ण दुप्पटीचा काळ १५१ ते १७५ दिवसांदरम्यान आहे, कुर्ला (एल), मालाड (पी-उत्तर), वांद्रे (एच-पश्चिम), चेंबूर (एम-पश्चिम), मरिन लाईन्स (सी), गोरेगाव (पी-दक्षिण), बोरिवली (आर-मध्य) परिसरात हा काळ १२६ ते १५० दिवसांदरम्यान आहे. उर्वरित विभागांमधील परिस्थितीही आता नियंत्रणात येऊ लागली आहे.

मुंबईत १,१४५ जणांना करोनाची बाधा

मुंबई : गेल्या १० दिवसांमध्ये मुंबईमधील करोना रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.२५ टक्क्यांनी घसरला आहे. रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.६० टक्के होता. तो ०.४४ टक्क्यांवर स्थिरावला आहे. मुंबईत शुक्रवारी १,१४५ जणांना करोनाची बाधा झाली असून ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. आता मुंबईतील रुग्ण संख्या २,५६,५०७ वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात ७८१ नवे रुग्ण

ठाणे : जिल्ह्य़ात शुक्रवारी ७८१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्य़ात करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २ लाख १० हजार ८७७ वर पोहोचली आहे. दिवसभरात २२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ३२३ इतका झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील २१८ जणांचा समावेश आहे.

राज्यात ६१९० बाधितांची नोंद

मुंबई : राज्यात शुक्रवारी ६ हजार १९० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ८ हजार २४१ रुग्णांनी या आजारावर मात केली असून १२७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजपर्यंत १५ लाख ३ हजार ५० बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात सध्या २५ लाख २९ हजार व्यक्ती गृह अलगीकरणात तर १२ हजार व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 12:22 am

Web Title: duration of double patient in mumbai is 157 days abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनाबाधितांच्या संख्येत ६० टक्क्यांनी घट
2 कर्ज काढून कर्मचाऱ्यांना वेतन
3 भाजपच्या विरोधानंतरही सुरक्षा रक्षकांच्या भरतीचा प्रस्ताव मंजूर
Just Now!
X