मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ४३५ दिवसांवर पोहोचला आहे. दिवसभरात ५२७ करोनाबाधित रुग्ण आढळले, १० जणांचा मृत्यू झाला.

करोनाबाधित रुग्णांच्या शोधार्थ मुंबईत मोठय़ा प्रमाणावर करोना चाचण्या करण्यात येत आहेत. बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याला विलगीकरणात ठेवून संसर्ग पसरू नये याची काळजी घेतली जात आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होत आहे. मार्चपासून आतापर्यंत तब्बल तीन लाख चार हजार ६४९ मुंबईकरांना करोनाची बाधा झाली.

विविध रुग्णालयांत उपचार घेणारे सात पुरुष आणि तीन महिलांचा गुरुवारी करोनामुळे मृत्यू झाला. या १० जणांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. आतापर्यंत ११ हजार २७६ मुंबईकरांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

गुरुवारी ५०३ रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. ९४ टक्के म्हणजे दोन लाख ८५ हजार ८१० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आजघडीला सुमारे सहा हजार ६६७ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

मुंबईतील करोनावाढीचा दर ०.२१ टक्क्यांवर स्थिर असून आतापर्यंत २६ लाख ५७ हजार ६६८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे १५० ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली असून त्यात चाळी आणि झोपडपट्टय़ांचा समावेश आहे. तर टाळेबंद केलेल्या दोन हजार २५४ इमारतींमधील रहिवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील दोन हजार ७९८ संशयित रुग्णांचा गेल्या २४ तासांमध्ये शोध घेण्यात पालिकेला यश आले आहे. यापैकी ४११ जणांना ‘करोना काळजी केंद्र-१’मध्ये दाखल करण्यात आले आहे. उर्वरित संशयित रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात २८६ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी २८६ करोनाबाधितांची नोंद झाली, तर दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ५० हजार ६९५, तर तर मृतांची संख्या ६ हजार ९४ इतकी झाली आहे.

दिवसभरात ठाण्यात ९०, कल्याण-डोंबिवली ७०, नवी मुंबई ५४, मीरा-भाईंदर ३५, बदलापूर १८, ठाणे ग्रामीण आठ, उल्हासनगर सहा, अंबरनाथ चार आणि भिवंडीत एक रुग्ण आढळला. तर ठाण्यातील तीन, कल्याण-डोंबिवलीतील दोन, नवी मुंबई एक आणि मीरा-भाईंदरमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

राज्यातील बाधितांची संख्या २० लाखांवर

* करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यातील करोनाबाधितांची संख्या २० लाखांवर गेली असून, यापैकी ९५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात करोनाचा पहिला रुग्ण गेल्या मार्च महिन्यात आढळला होता. यानंतर देशात करोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातच आढळले.

* गेल्या १० महिन्यांत राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या २० लाखांवर गेली. यापैकी १९ लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले. करोनामुळे आतापर्यंत ५०,६३४ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्युदर २.५३ टक्के इतका आहे. दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत २,८८६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात ५२ जणांचा मृत्यू झाला.