मुंबईतील करोनाबाधित संसर्गमुक्त होण्याचे प्रमाण ८० टक्क्य़ांवर पोहोचले असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८९ दिवसांवर आला आहे. त्यामुळे हळूहळू करोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. गेले दोन दिवस नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, बुधवारी १,१३२ जणांना करोनाची बाधा झाली असून ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील एकूण बाधितांची संख्या एक लाख ३१ हजार ५४२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत मुंबईत सात हजार २६५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी मृत्यू झालेल्यांपैकी ३८ जणांना दीर्घकालीन आजार होते. ४६ जणांमध्ये २८ पुरुष आणि १८ महिलांचा समावेश होता. विविध रुग्णालयांमध्ये दाखल असलेले ८६४ रुग्ण करोनामुक्त झाले असून आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या एक लाख सहा हजार ५७ इतकी आहे.

मुंबईतील ७० नर्सिग होम बिगर करोना उपचारांसाठी खुली

शहरात २४ विभागांमध्ये करोना उपचाराकरिता पालिकेने ताब्यात घेतलेली ७० छोटी नर्सिग होम्स करोना उपचारातून वगळल्याचे आदेश पालिकेने बुधवारी दिले आहेत.

शहरातील ४१ टक्के करोनाबाधितांचे मृत्यू नर्सिग होम्समध्ये होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर या रुग्णालयांशी चर्चा पालिकेने केली होती. यावरून पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. पावसाळ्याच्यादृष्टीने अन्य आजारांसाठी विभागांमधील छोटी नर्सिग होम्स बिगर करोना उपचारांसाठी खुली केली असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयमुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.