एकीकडे ब्रॅण्डेड दूध उत्पादक दर्जाची हमी देत असतानाच राज्यातील दूधाचा दर्जा किती घसरला आहे याचे प्रात्यक्षिक मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत पाहायला मिळाले. राज्यभरातील प्रमुख दूध उत्पादक व विक्रेत्यांना दूधभेसळीसंबंधी माहिती व त्यावर सुरू असलेल्या कारवाईची माहिती देताना राज्याच्या विविध भागातून आणलेल्या दूधाच्या ९५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यातील १० नमुने दुय्यम दर्जाचे असल्याचे आढळले.
दूधभेसळीसंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडून बेधडक कारवाई हाती घेण्यात आली असून नोव्हेंबरमध्ये जळगाव येथे १५ दूध व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. जळगाव येथे घेण्यात आलेल्या २६ दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या नमुन्यांपैकी तब्बल १४ नमुने असुरक्षित आढळले. डिसेंबरमध्ये कोल्हापूर, मुंबई व ठाणे येथून १५१ नमुने तपासण्यात आले व असुरक्षित दूधाबाबत फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले. दूधभेसळीबाबतच्या या घटनांच्या पाश्र्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी राज्यभरातील दूध उत्पादक व वितरकांची बैठकत आयोजित केली होती. या बैठकीला चारशे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींसमोर राज्यभरातून आणलेल्या ९५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातून १५ नमुन्यांमध्ये स्निग्ध पदार्थ व सायीव्यतिरिक्त इतर घटक पदार्थाचे प्रमाण अपेक्षित निकषांपेक्षा कमी आढळले. या दुय्यम दर्जाच्या दूधासाठी फौजदारी कारवाई होत नसली तरी दंड लावला जातो. सर्व प्रतिनिधींसमोरच दूधाचा दर्जा उघड झाल्याने आता दूधभेसळ व दर्जाबाबत अधिक सजगतेने पाहिले जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दूधाचे संकलन, प्रक्रिया व पुरवठा या सर्वच पातळ्यांवर दूधाबाबत दक्ष राहून ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार दूध उपलब्ध करून देणे ही दूध व्यावसायिकांची जबाबदारी आहे. दूध भेसळीवर आळा घालण्यासाठी उत्पादन ते विक्रीपर्यंत सर्व पातळ्यांवर प्रबोधन करण्यासाठी फोरम तयार करण्यात येत आहे, असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.