अंधेरी, दादर, माहीम येथे विविध कामे सुरू; काही कायमस्वरूपी वेगमर्यादाही हटणार

वर्षभरापूर्वी कोणत्याही कारणाविना दर दिवशी १५ ते २० मिनिटे उशिराने धावणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या गाडय़ा यंदा थोडय़ाफार ‘रुळावर’ आल्या असल्या, तरी या मार्गावर वक्तशीरपणा येण्यासाठी आणखी एका वर्षांचा अवधी लागणार आहे. त्यासाठी अंधेरी-जोगेश्वरी यांदरम्यान रेल्वेरुळांची रचना बदलण्यापासून दादर यार्डची रचना बदलण्यापर्यंत अनेक कामे हाती घेतली आहेत. या कामांनंतर पश्चिम रेल्वेवर सध्या काही ठिकाणी असलेल्या कायमस्वरूपी वेगमर्यादाही हटवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर सध्या दर तीन मिनिटांच्या अंतराने एक, अशा दर दिवशी १३०५ सेवा चालवल्या जातात. ‘परे’च्या क्षमतेपेक्षा या सेवा जास्त आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर बिघाड झाल्यास त्यातून बाहेर पडण्यासाठी अवधी मिळत नाही. एक वर्षांपूर्वी ‘परे’वरील गाडय़ा जवळपास प्रत्येक दिवशी वेळापत्रकापेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामागे अंधेरी, बोरिवली आदी महत्त्वाच्या स्थानकांच्या यार्डची जुनाट रचना असल्याचे ‘परे’च्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या मार्गावरील गाडय़ा बोरिवली किंवा अंधेरी येथे मार्गिका बदलतात. म्हणजे एखादी धिमी गाडी बोरिवली किंवा अंधेरी येथून जलद होते वा एखादी जलद गाडी या दोन स्थानकांपासून धिमी होते. त्यामुळे या यार्डामध्ये कायमस्वरूपी ५० किमीची वेगमर्यादा होती. ‘परे’ने बोरिवली यार्डातील संपूर्ण काम आणि अंधेरी यार्डाचे मुंबईच्या बाजूचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे या भागातील ५० किमीची वेगमर्यादा हटली असून आता गाडय़ा ताशी ८० ते १०० किमी वेगाने धावतात. त्याचा अनुकूल परिणाम वेळापत्रकावर झाला आहे.

सध्या ‘परे’ दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या मुंबई बाजूकडील यार्डातील एक मार्गिका खुली करण्याच्या प्रयत्नात आहे. या यार्डातील लांब पल्ल्याची गाडी आधी दादर स्थानकात येते आणि मग मुंबई सेंट्रलच्या दिशेने जाते. त्यामुळे दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच गुंतलेला राहतो. भविष्यात काही बिघाड झाल्यास हा प्लॅटफॉर्म वापरून वेळापत्रकातील वक्तशीरपणा सांभाळण्याच्या दृष्टीने ही मार्गिका येत्या दोन-तीन दिवसांत खुली होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच पावसाळ्यानंतर अंधेरी यार्डाताली जोगेश्वरीच्या दिशेचे काम हाती घेतले जाईल. हे काम त्यापुढील सहा महिन्यांमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर ‘परे’वरील गाडय़ांची वाहतूक वेळापत्रकबरहुकूम होईल, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला.