सलग तीन दिवसांपासून कसारा- टिटवाळा रेल्वे मार्ग बंद असल्याने अखेर प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. शुक्रवारी सकाळी वाशिंद येथे संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला असून लोकल सेवा तातडीने सुरु करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

तीन दिवसांपूर्वी नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे डबे आसनगाव- वाशिंददरम्यान रुळावरुन घसरले होते. ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुरांतो एक्स्प्रेसचे डबे हटवण्यात यश आले. मात्र या मार्गावरील तांत्रिक काम अजूनही सुरु असून यासाठी किमान दोन दिवस लागतील असे समजते. यामुळे अजूनही कसारा ते टिटवाळा हा मार्ग बंद आहे. टिटवाळ्यातून सीएसटीएम या मार्गावरच लोकल ट्रेन सुरु आहेत. सलग तीन दिवस ट्रेन नसल्याने कसारा ते वाशिंद या स्थानकांवरील प्रवाशांचे हाल होत आहेत. अखेर या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक शुक्रवारी सकाळी झाला.

वाचा: रेल्वे प्रवास आणखी काही दिवस खडतर

काही प्रवाशांनी स्टेशन मॅनेजरचे कार्यालय गाठून लोकल सेवा पूर्ववत होण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला. यासाठी आणखी काही दिवस लागतील असे उत्तर मिळाल्याने प्रवाशी संतापले. संतप्त प्रवाशांनी रुळावरुन उतरून दादर- अमृतसर एक्स्प्रेस रोखून धरली. तातडीने लोकल सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केली.

सध्या कसारा ते टिटवाळा हा मार्ग बंद असला तरी टिटवाळ्याहून कसाराकडे जाणारा मार्ग सुरु आहे. या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात असून प्रवाशांच्या सोयीसाठी या एक्स्प्रेसना प्रत्येक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. मात्र मुंबईकडे येण्यासाठी पर्याय नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष आहे. पावसामुळे दुरुस्ती कार्यात अडथळे येत असल्याचे रेल्वेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.