कळंबोली वाहतूक विभागात गुरुवारी सायंकाळी सुरू झालेल्या ई-चलन पावतीमुळे नवी मुंबईचा २०१५ सालचा वाहतुकीचा कारभार यापुढे हायटेक होण्यावर शिक्कामोर्तब झाले. या हायटेक कारवाईमुळे यापुढे पोलिसांच्या दंडाची रक्कम घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने किंवा महासेतू केंद्रातही वाहनचालकांना भरता येणार आहे. वारंवार ताकीद देऊनही चूक करणाऱ्या वाहनचालकांना आपल्या वाहन  परवान्यावर र्निबधही याच कारवाईमुळे होण्याची शक्यता आहे.
कळंबोली पोलिसांनी सायंकाळी १५ जणांवर ई-चलन पद्धतीने कारवाईचा केली. या कारवाईमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांजवळ यापुढे टॅब असणार आहेत.  य्हेल्मेटविना प्रवास करणाऱ्या नारायण गोसावी या दुचाकीस्वारावर कळंबोली सर्कल येथे कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरीधर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांकडील टॅबमुळे यापुढे पुन्हा कधी गोसावी यांनी विनाहेल्मेट प्रवास केल्यास त्यापूर्वीची नोंद कारवाई करणाऱ्या हायटेक पोलिसांच्या टॅबमध्ये उघड होणार आहे.