नवी मुंबईच्या धर्तीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी शुक्रवारपासून दंड आकारण्याची ई-चलन पद्धत सुरू केली. नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, सिग्नल मोडणे, दारू पिऊन वाहन चालविणे अशा स्वरूपाच्या नियमांचा भंग करण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असताना दंड आकारण्याच्या या नव्या पद्धतीमुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढेल, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला. दरम्यान, रिक्षा भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांविरोधात कारवाई करताना ही नवी पद्धती प्रभावी ठरू शकेल, असा विश्वास ठाण्याच्या     पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी व्यक्त केला.
ई-चलनासाठी वाहतूक पोलिसांना तीन यंत्रे पुरविण्यात आली असून त्यावर संबंधित वाहनचालकाची माहिती तसेच त्याला किती दंड भरायचा आहे हे नमूद असेल. यामुळे संबंधित वाहनचालकाने वाहतुकीचे नियम यापूर्वी मोडले आहेत का हे लगेच समजू शकेल. या नव्या यंत्रणेत पोलिसांना कॅमेरे पुरविण्यात आले असून शहरातील प्रमुख चौकांमध्ये त्याआधारे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे चित्रीकरण उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सिग्नल मोडल्यानंतर आपण नियम मोडला नाही असा दावा करत पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या वाहनचालकांना आळा बसणार आहे. दरम्यान, सातत्याने नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची माहिती यामुळे पोलिसांकडे उपलब्ध असणार आहे. या माहितीच्या आधारे प्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने अशा वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, अशी  करंदीकर यांनी दिली. नियम मोडून वाहनचालक पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला, तर वाहन क्रमांकाच्या आधारे मिळणाऱ्या पत्त्याच्या आधारे त्याच्या घरी दंडांची पावती पाठविण्याची सुविधाही यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. पुढील तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर ठाण्यात ही मोहीम राबविण्यात येईल. पुढील तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ठाण्यात ही मोहीम राबवली जाईल. पुढील टप्प्यात डोंबिवलीत ही व्यवस्था अमलात येईल.