५६ टक्के तरुणाईचा समज; सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या पाहणी अहवालातील निष्कर्ष

मुंबईतील ५६ टक्के तरुणांना ई सिगारेटस धूम्रपानाचा सुरक्षित पर्याय वाटत असल्याचा निष्कर्ष सलाम बॉम्बे फांऊडेशनने केलेल्या पाहणी अहवालात काढण्यात आला आहे. मुंबईमधील ३०६ तरुणांची पाहणी यामध्ये केली आहे. विशेष म्हणजे यातील १५ टक्के तरुण नियमितपणे वापरत असल्याचे आढळून आले.

ई धूम्रपान आरोग्याला धोकादायक असल्याचे विविध संशोधनाच्या माध्यमातून सिद्ध झाले असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने यावर बंदी आणली आहे. मात्र असे असूनही मुंबईत ई सिगारेटचा सर्रास वापर होत असल्याचे या अहवालातून अधोरेखित केले आहे. जागतिक तंबाखूविरोध दिनानिमित्ताने आरोग्य विभाग, जागतिक आरोग्य संघटना आणि फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात हा अहवाल प्रकाशित केला. ७३ टक्के तरुणवर्गाने हे ई सिगारेटचा वापर केला असून यात मुलांचे प्रमाण ५० टक्के आहे. ई सिगारेटचे झुरके अनुभवलेल्यामधील ८० टक्के तरुणांनी यापूर्वी कधीच तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केलेले नाही. ई सिगारेट ही एक स्टाइल वाटत असून याचे आरोग्यावर हानिकारक परिणाम कमी असल्याने हिचा वापर असल्याचे या तरुणांनी नमूद केले आहे. यातील जवळपास ५६ टक्के तरुणांनी ई धूम्रपान सुरक्षित असल्याचे नोंदविले आहे. यावरून फ्लेवरयुक्त ई धूम्रपानाकडे तरुणाई अधिक प्रमाणात आकर्षित होत असल्याचे या पाहणी अहवालातून मांडले आहे.

‘सुरुवातीला सुरू झालेला ई -सिगारेटचा वापर कालांतराने त्यांना सिगारेटच्या धूम्रपानाच्या व्यसन जडण्यास कारणीभूत ठरत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. आकर्षक रंग आणि फ्लेव्हर्समध्ये उपलब्ध असलेली ई धूम्रपान तरुणाईला भुरळ पाडत आहे. तेव्हा यावर कडक बंदी राबविणे आवश्यक असल्याचे सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या संशोधन विभागाचे उपाध्यक्ष शेरिंग भुतिया यांनी सांगितले.