संगणकीय उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पुनर्वापर करणाऱ्या कंपन्यांच्या पदरात

दिवाळी म्हटलं की अवघ्या घराची सफाई केली जाते. कोनाडय़ात, अडगळीत पडलेले भंगार सामान तसेच रद्दी बाहेर काढून त्याची वासलात लावली जाते. यातच आता ‘ई कचऱ्या’चीही भर पडू लागली आहे. इलेक्ट्रॉनिक्स तसेच संगणकीय उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे आता ‘ई कचरा’ही मोठय़ा प्रमाणात तयार होऊ लागला आहे. या पाश्र्वभूमीवर असे सामान भंगारवाल्याच्या हाती सोपवण्यापेक्षा पुनर्वापर करणाऱ्या कंपन्यांना देण्याकडे सर्वसामान्यांचा कल वाढत आहे.

सण आला की नवीन इलेक्ट्रॉनिक गॅझेट घ्यायचे आणि जुन्याला घरातील एका कोपऱ्यात फेकून द्यायचे. त्याचा वापर झाला तरी ठीक अन्यथा किमान पाच ते सहा महिने तरी ते तसेच पडून राहते. मग सणांच्या दिवसांत साफसफाई करताना अचानक आपल्याला नको असलेली ई-उपकरणे आपल्यासमोर येतात आणि त्यांचे काय करायचे हा प्रश्न आपल्याला पडतो. त्या उपकरणांमध्ये असलेल्या बॅटरीवर ती केराच्या टोपलीत टाकू नये, असे लिहलेले असते. यामुळे तर गोंधळ आणखीच वाढतो. पण दुसरा कोणता पर्याय समोर नसतो त्यामुळे ते उपकरण केराच्या टोपलीत जाते. त्यातही उपकरणाची अवस्था जरा बरी असेल तर ते भंगारवाल्यांकडे देतो. या अशास्त्रीय पद्धतीने ई-कचऱ्यांची लावली जाणारी विल्हेवाट पर्यावरणास घातक असते. पण गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ई-कचऱ्याबाबत जागरूकता वाढते आहे. या कचऱ्यातून पुनर्वापराच्या वस्तू बाहेर काढणाऱ्या कंपन्यांकडे हा कचरा देण्याकडे कल वाढू लागला आहे. अर्थात हा कल कंपन्यांमध्ये असला तरी घरांमध्ये तो तुलनेत कमीच होता. गेल्या काही वर्षांमध्ये शाळा-महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या जागृती कार्यक्रमांमधून घरातील कचराही या कंपन्यांकडे येऊ लागला आहे. यंदाच्या दिवाळीत यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण काही कंपन्यांनी नोंदविले आहे.

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे अनेक कंपन्यांना त्यांचा ई-कचरा पुनर्वापरासाठीच द्यावा लागतो. मात्र घरातील ई-कचराही पुनर्वापरासाठी दिला जाऊ शकतो याबाबत जागृती होत असून अनेक घरांमधून यासंदर्भातील चौकशीसाठी फोन येण्यास सुरुवात झाल्याचे ई-इन्करनेशनचे संस्थापक गौरव माड्रीया यांनी सांगितले. यंदाच्या दिवाळीत घरगुती चौकशींमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच शहरात विविध ठिकाणी लावलेल्या ई-कचरापेटय़ांमध्येही कचरा येऊ लागल्याचेही ते म्हणाले. अनेक नागरीत आमच्या परिसरात ई-कचरापेटी लावण्याबाबतही चौकशी करत असून ही सकारात्मक बाब असल्याचेही गौरव यांनी नमूद केले. तर सणांच्या काळाबरोबरच इतर वेळीही घरगुती ई-कचरा जमा करण्याबाबत लोकांचे दूरध्वनी येण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे ई-वेस्ट रिसायकलिंग इंडियाचे सलीम यांनी नमूद केले.

असे मिळतात दर

प्रत्येकाला आपल्या वस्तूची किंमत हवी असते. अनेक जण अगदी रद्दीवाल्याने किलो मागे एक रुपया कमी दिला तरी त्याच्याशी वाद घालून आपल्या रद्दीला योग्य भाव मिळवून घेतात. तसेच काहीसे ई-कचऱ्याच्या बाबतीत असल्याचे गौरव यांनी नमूद केले. यामुळे अ़ाम्हीही ई-कचऱ्यालाही विशेष दाम देण्याचे प्रयत्न करत असल्याचेही गौरव म्हणाले. यामध्ये एक किलो कचऱ्यासाठी १५ ते २० रुपये दिले जातात. यातच ई-कचरा कोणता आहे त्यानुसार दर बदलत जातात. म्हणजे एखादे उपकरण वापरता येणारे असेल तर त्याचे दर तसे वाढतात. सुरू असलेल्या मोबाइलला त्याच्या ब्रॅण्डनुसार एक ते दोन हजार रुपयांपर्यंत मोबदला दिला जात असल्याचेही गौरव म्हणाले. हेच बंद मोबाइलसाठी १०० ते २०० रुपये दिले जातात.