विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असून, आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम ई-शिक्षण पद्धतीने शिकवणारे मायक्रो एसडी कार्ड तयार केले आहे. हे कार्ड आणि त्यासोबत एक टॅब प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत देण्यात येईल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत केली. राज्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनाही या पद्धतीने शिकवण्यासाठी सुसज्ज पेनड्राईव्ह सर्व शाळांमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सत्तापालट झाल्यावर ही कार्ड आणि टॅब वाटण्यात येईल, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्याचे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते आम्ही या ई-शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून पूर्ण करीत आहोत, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिकणाऱया विद्यार्थ्यांना या टॅबचा उपयोग होईल. मात्र, लवकरच गुजराथी, ऊर्दू आणि इतर भाषांसाठीही हा टॅब उपलब्ध करून देण्यात येईल. या टॅबसोबत प्रत्येक विद्यार्थ्याला एक सौरऊर्जेवर चालणारा चार्जरही देण्यात येईल. अमृतभाई शहा यांच्या संकल्पनेतून हे सर्व साकारले गेल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी राज्यातील परीक्षार्थींना मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील ९ केंद्रांवरील ५०० परीक्षार्थी या मार्गदर्शनाचा लाभ घेणार आहेत. विजय कदम यांच्या संकल्पनेतून हा वर्ग सुरू करण्यात येत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले.
अमित शहांच्या दौऱयाबद्दल बोलणे टाळले
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱयाच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांवर काहीही बोलणे उद्धव ठाकरे यांनी टाळले. अमित शहा उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाणार की नाही, याबद्दल त्यांनी काहीही माहिती दिली नाही.