26 September 2020

News Flash

आयुक्तच चोर आहेत!

नगरसेवक आणि कंत्राटदारांमधील संगनमताला खीळ घालण्यासाठी प्रशासनाने आणलेल्या ई-टेंडरमध्येच घोटाळा झाल्याने आयुक्तांना घरचा आहेर मिळालेला असतानाच पालिका सभागृहात आयुक्तांना 'चोर' ठरवत सर्व पक्षांनी एकमताने सभागृह

| September 20, 2014 01:47 am

नगरसेवक आणि कंत्राटदारांमधील संगनमताला खीळ घालण्यासाठी प्रशासनाने आणलेल्या ई-टेंडरमध्येच घोटाळा झाल्याने आयुक्तांना घरचा आहेर मिळालेला असतानाच पालिका सभागृहात आयुक्तांना ‘चोर’ ठरवत सर्व पक्षांनी एकमताने सभागृह तहकूब केले. आयुक्त हजर होईपर्यंत प्रत्येक सभा अशीच तहकूब होत राहील, अशी घोषणा महापौरांनी केली.
महापालिकेतील ई-टेंडर घोटाळ्याचे पदसाद शुक्रवारी सभागृहात उमटले. ई-टेंडरिंगमध्ये निविदा भरण्यासाठी तीन लाख रुपये खर्चाच्या कामांना तीन दिवसांचा तर पाच लाखापर्यंतच्या कामांना सात दिवसांचा कालावधी दिला जातो. मात्र, स्वतच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्यासाठी नऊ विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एबीएम या सॉफ्टवेअर कंपनीला हाताशी धरून केवळ काही वेळापुरती वेबसाइट सुरू ठेवली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला. ई-टेंडरिंगमध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अहवाल चाचणी लेखा परीक्षा व दक्षता अधिकारी यांनी आयुक्तांना सादर केला. मात्र, तरीही थेट कारवाई न करता आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी उपायुक्तांकडे सोववून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे, असेही आंबेरकर म्हणाले. नागरी कामांमध्ये नगरसेवक व कंत्राटदार यांच्यामध्ये संगनमत होत असल्याचा आरोप करून ऑक्टोबर २०१२ मध्ये ऑनलाइन टेंडरचा पर्याय प्रशासनाने निवडला होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने व कामे खोळंबल्याने ऑक्टोबर २०१३ मध्ये इ टेंडरिंगचे प्रमाणे ५० टक्क्य़ांवर आणले गेले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून तक्रार
पालिकेतील १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. या घोटाळ्यात सहभागी झालेले कंत्राटदार व अभियंते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
आयुक्तांविरोधात घोषणा
आयुक्त सीताराम कुंटे यांनी सभागृहात येऊन घोटाळयाप्रकरणी उत्तर द्यावे, अशी मागणी नगरसेवक करत होते. मात्र आयुक्त उपस्थित होत नसल्याने नगरसेवकांनी आयुक्त हाय हायच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. हिशोब मागत नगरसेवकांनी सभागृह दणाणून सोडले. मात्र आयुक्त सभागृहात न आल्याने सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी सभा झटपट तहकूब करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेत्यांनी त्याला अनुमोदन दिले आणि थेट आयुक्तांच्या केबिनवर मोर्चा नेला. मात्र आयुक्त केबिनमध्ये नसल्याने विरोधी पक्षनेत्यांचा राग आणखी वाढला. आयुक्त महाचोर, आयुक्तने लुटा, आयुक्त हाय हायचे नारे देत राष्ट्रवादी पक्षनेते धनंजय पिसाळ यांनी आयुक्तांच्या केबिनच्या दरवाजासमोर नारळ  फोडला.
केवळ या दरम्यान वेबसाइट सुरू ठेवल्याचा आरोप..
*एच पूर्व- २८ डिसें. २०१३ – संध्या. ७.३०
२९ डिसें. २०१३ – दुपारी १.३०           
*के पूर्व – २८ डिसें. १३ – संध्या. ७ वा.
२९ डिसें. – दुपारी १.३० वा.  
११ डिसें. – रा १२.३० ते स. ६    
*पी दक्षिण – ३ सप्टें. १४ – सकाळी ९.३०
 ४ सप्टें. १४ – पहाटे ४ वा.
*पी उत्तर – १३ डिसें. ते २० डिसें. १३ – संध्या. ५.३० ते रात्री ८.३० वा.
*आर मध्य – १४ नोव्हें. १३- सकाळी ९.३० ते दुपारी ३.३०
*आर दक्षिण – ११ डिसें. १३ – पहाटे ३.२५ ते सकाळी ८.५९ वा.
*आर उत्तर – ३१ डिसें. २०१३ – पहाटे ३.३५ ते सकाळी. ८.५९ वा.
*टी – १२ डिसें. २०१३ – रात्री ९.२० ते पहाटे ३.२५ वा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 1:47 am

Web Title: e tender scam bmc ceo scammer
Next Stories
1 ‘आयओएस’ अद्ययावत करण्यात जागेची अडचण
2 मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायची की नाही?
3 सफाई कामगाराची गोळ्या घालून हत्या
Just Now!
X