गेल्या १३ वर्षांत ५० लाखांचे उत्पन्न

दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा महसूल गोळा करणाऱ्या देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिकेला झाडांपासून दरवर्षी सरासरी पाच लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. पवई उद्यान, भांडुप टेकडी, विहार तलाव व वेरावली टेकडी येथे असणाऱ्या ताड, नारळ व आंब्याच्या झाडापासून पालिकेने ऑगस्ट २००४ पासून जुलै २०१७ या १३ वर्षांत तब्बल ५० लाख रुपयांची कमाई झाली आहे. तर २०२१ पर्यंत आणखी ११ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

झाडांपासून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते याची पालिकेला फारशी कल्पना नव्हती. पण उद्यान खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे पालिकेने २००१ पासून झाडांपासून कमाई करण्याचा निर्णय घेतला. पवई, वेरावली, भांडुप येथील ताड, आंबा व नारळ या झाडांची बोली लावण्यात आली. यात पालिकेला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे तीन वर्षांत ९ लाख २० हजार रुपयांची कमाई झाली. त्यानंतर २००४ मध्ये तीन वर्षांसाठी झाडांची बोली लावण्यात आली. या वेळीही पालिकेच्या तिजोरीत तब्बल ९ लाख १७ हजार रुपये जमा झाले. त्यानंतर या उत्पन्नात वाढ होत गेली.

जुलै २०१७ पर्यंत पालिकेला तब्बल ५० लाख रुपये उत्पन्न मिळाले. २०१४ ते २०१७ या तीन वर्षांत पालिकेच्या तिजोरीत सर्वाधिक १५ लाख ३५ हजार रुपये जमा झाले. येथील झाडांची आता २०२१ पर्यंत बोली लावण्यात आली असून या काळात पालिकेला ११ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले. पवई उद्यानासह अन्य ठिकाणी पालिकेच्या मालकीची लाखो झाडे आहेत. यात ताडाच्या झाडांची संख्या २७०, नारळ ४१० व आंब्याची सुमारे २०० झाडे आहेत. विशेष म्हणजे येथील गवताचीही विक्री करण्यात येत असल्याचे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.

वर्ष          उत्पन्न

२००४      ५ लाख २३ हजार रुपये

२००७       ९ लाख १७ हजार रुपये

२०११       ९ लाख ३३ हजार रुपये

२०१४       १० लाख रुपये

२०१७       १५ लाख ३५ हजार