पालघर जिल्ह्यातील काही भाग रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास भुकंपाच्या धक्क्यांनी हादरला. अचानक झालेला गुढ आवाज आणि हादऱ्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये काही काळ भितीचे वातावरण होते. दरम्यान, इथल्या काही घरांना तडे गेल्याचेही सुत्रांकडून कळते. हा प्रकार भूकंपाचा प्रकार असल्याची पुष्टी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप असल्याचे कळते.

डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, चिंचले, दपाचारी, हळदपाडा, आंबोली, सांसवंद, वकास, वरखंडा या भागात तसेच तलासरी तालुक्यातील वडवली, तलासरी, सवणे, कवाडा, वसा, कुर्झे, कारजगाव या भागात गुढ आवाज आणि धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे इथल्या काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. काही घरांमधील भिंतीवर लावलेल्या वस्तू हादऱ्यांमुळे खाली पडल्याचे सुत्रांकडून कळते. यामुळे नागरिकांनी तत्काळ आपल्या घरांबाहेर धाव घेतली. मात्र, अशा पद्धतीने गुढ स्वरुपाचे आवाज होण्याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. कारण यापूर्वीही ३ नोव्हेंबर रोजी या परिसरात असाच गुढ आवाज होऊन धक्के जाणवले होते.

दोनदा गुढ आवाजांचा प्रकार येथे घडला असून गेल्यावेळीही हा आवाज कशामुळे झाला याचे कारण समजू न शकल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाकडून हा प्रकार भुकंपाचा असल्याचे सांगितले असले तरी आवाज ऐकू येण्याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही, त्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांना अनेक शंका-कुशंकांनी घेरले आहे.