वांद्रे-कुर्ला संकुलाशी जोडून दोन्ही मार्गावरील वाहतुकीला नवीन पर्याय देणार
पूर्व द्रुतगती महामार्गावरून वरळी किंवा हाजीअली-पेडर रोड परिसरात कामासाठी जाणाऱ्या लोकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आणि दादर व शीव येथे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. पूर्व द्रुतगती महामार्गाला वांद्रे-कुर्ला संकुलाशी जोडणारा बीकेसी कनेक्टर आणि वांद्रे-कुर्ला संकुलातून थेट सागरी सेतूला जोडणारा उड्डाणपूल हे दोन प्रकल्प मुंबईतील वाहतुकीची दिशा बदलणार आहेत. यापकी बीकेसी कनेक्टर प्रकल्पाचे काम सुरू झाले असून वांद्रे-कुर्ला संकुल ते सागरी सेतू या मार्गाची निविदा प्रक्रिया येत्या वर्षअखेर पूर्ण होणार आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरून वांद्रे-कुर्ला संकुलात येण्यासाठी थेट रस्ता आहे. मात्र पूर्व द्रुतगती महामार्गावरून वांद्रे-कुर्ला संकुलात येण्यासाठी कोणताही थेट रस्ता नाही. या मार्गावरून सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याने कलिना रस्त्यावरील सिग्नलवरून डावीकडे वळून संकुलात यावे लागते. त्याशिवाय शीव स्थानक ओलांडून लाल बहादूर शास्त्री मार्गाने वांद्रे-कुर्ला संकुलात येता येते. पण या दोन्ही मार्गावरून संकुलात येण्यासाठी सध्या २५ ते ३० मिनिटांचा अवधी जातो. तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातून सागरी सेतूला जाण्यासाठी कलानगर जंक्शनजवळील दोन मोठे सिग्नल ओलांडावे लागतात.
मुंबईकरांची ही अडचण दूर करण्यासाठी आणि वांद्रे-कुर्ला संकुलाला इतर मुंबईशी वेगवान मार्गाने जोडण्यासाठी एमएमआरडीएने हे दोन प्रकल्प हाती घेतले आहेत. एमएमआरडीएच्या जी ब्लॉकमधून निघणारा बीकेसी कनेक्टर हा मार्ग मिठी नदीवरून पूर्व द्रुतगती महामार्गावर थेट चुनाभट्टीच्या जवळ बाहेर पडणार आहे. त्यासाठी रेल्वेमार्गावरही पूल बांधण्याची आवश्यकता आहे. या मार्गाचे काम चालू झाले असून पुढील दीड ते दोन वर्षांत हा मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरून थेट वांद्रे-कुर्ला संकुलात पोहोचता येणार आहे. तर, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातून बांधण्यात येणारा उड्डाणपूल कलानगरजवळील दोन्ही सिग्नल टाळून थेट सागरी सेतू मार्गाला जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया डिसेंबर अखेपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर नव्या वर्षांत या प्रकल्पाचे काम सुरू होणार असून पुढील दोन वर्षांमध्ये तो पूर्ण होण्याची शक्यता एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तवली. हे दोन्ही मार्ग पूर्ण झाल्यावर पूर्व द्रुतगती महामार्गावरून सागरी सेतूला जाण्यासाठी फक्त २० ते २५ मिनिटे लागतील.