पूर्व द्रुतगती मार्गाची दुरवस्था

मुंबई : ठाणे आणि मुंबईला जोडणारा पूर्व द्रुतगती महामार्ग अनेक ठिकाणी खडबडीत झाल्याने वाहनचालकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पावसाळ्यात पडतात तसे मोठाले खड्डे नसले तरी रस्ता अनेक ठिकाणी खडबडीत झाल्याने या मार्गावर दुचाकीस्वारांचे रोज अपघात होत आहेत.

मुंबई शहरातील महत्त्वाच्या महामार्गापैकी एक असलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गावर सध्या मोठय़ा जोमाने ‘मेट्रो’चे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी पत्रे लावण्यात आले आहेत, तर घाटकोपर उड्डाणपुलाला जोडून अन्य एका उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या सर्व कामांमुळे एकीकडे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच अनेक ठिकाणी रस्त्यांवर लहान-लहान खड्डे तयार झाल्याने याचाही वाहतूक कोंडीवर मोठा परिणाम होत आहे.

अवजड आणि लहान वाहनांसह या मार्गावर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मार्गावर असलेले लहान खड्डे या दुचाकीस्वारांसाठी घातक ठरत आहेत. वाहतूक कोंडी नसल्यावर या मार्गावरून दुचाकी अतिवेगाने जातात. मात्र याच वेळी अनेकांना या खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने मोठय़ा प्रमाणात अपघात होत आहेत. चेंबूर अमर महल ते घाटकोपर उड्डाणपूल या दरम्यान अशा प्रकारे अनेक ठिकाणी लहान-लहान खड्डे हे दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहेत.

वाहतूक पोलिसांनाही मनस्ताप

अपघात झाल्यानंतर वाहतूक पोलीसच जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करतात. शिवाय अपघातामुळे बराच वेळ वाहतूकही ठप्प होत असल्याने याचा मोठा त्रास वाहतूक पोलिसांनाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अनेकदा हे खड्डे भरण्यासाठी एमएमआरडीएला तक्रारी दिल्या. मात्र सध्या या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने संबंधित कंत्राटदार हे खड्डे भरणार असल्याचे सांगत एमएमआरडीए अधिकारी हात झटकत असल्याची माहिती एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने दिली.